महावितरणच्या ठेकेदाराची मनमानी

शेतकर्‍यांच्या शेतातून टाकले विद्युत पोल

| पाली | वार्ताहर |

वाकण येथील शेतकरी दिलीप कन्हैयालाल मोदी यांची मुंबई गोवा महामार्ग लगत मालकीची शेत जमीन असून या शेत जमिनीतून महावितरणचे खाजगी ठेकेदार यांनी मनमानी करत शेतकर्‍यांच्या जागेतील समोरील बाजूस पाच विद्युत खांब उभे केले. याचा शेतकर्‍यांनी संताप व्यक्त करीत नागोठणे महावितरण कार्यालय व नागोठणे पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित ठेकेदारा विरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महावितरणचे खाजगी ठेकेदार राहुल जगन्नाथ म्हात्रे यांनी जे.एस.डब्ल्यू कंपनीची अंबा नदीकिनारी पाण्याची जॅकवेल असलेल्या ठिकाणी विद्युत पुरवठा पोचविण्याकरिता महावितरणकडून ठेका घेतला. या कामाचे विद्युत पोल त्यांनी वाकण येथील दिलीप मोदी यांच्या मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या त्यांच्या मालकीच्या जागेत उभे केले, असे मोदी यांचे म्हणणे आहे. वरील विद्युत लाईनचे काम करण्याकरिता ठेकेदाराने शेतीचे मालक यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने हे काम त्वरित थांबवून शेतात टाकलेले विद्युत खांब काढण्यात यावे, अशी तक्रार मोदी यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

महावितरणच्या अधिकार्‍यांनी संबंधित ठेकेदाराला आमच्या जागेतील विद्युत पोल तात्काळ काढण्यास सांगावे. अन्यथा मी माझ्या कुटुंबासह आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसेन.

दिलीप मोदी, शेतकरी, वाकण

जिल्ह्यातील श्रीमंत कंपनीच्या नावाखाली महावितरणचे खाजगी ठेकेदार शेतकर्‍यांची कोणती परवानगी न घेता शेतकर्‍यांच्या मालकीच्या शेतीतून विद्युत पोल टाकून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसत आहे. या मनमानी कारभाराकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने तात्काळ लक्ष घालून सर्वसामान्य शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवावी.

विनोद भोईर, अध्यक्ष सुधागड प्रेस क्लब
Exit mobile version