विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त; संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंद साजरा
| चणेरा | प्रतिनिधी |
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित तसेच विद्यार्थ्यांच्या संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी रोहा शहरात रविवारी (दि.26) उत्साहपूर्ण वातावरणात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत लोकशाही मूल्ये, संविधानिक अधिकार आणि शांततामय आंदोलनाच्या समर्थनाचा ठाम संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
दमखाडी येथील नवरत्न हॉटेल परिसरातून रॅलीला प्रारंभ झाला. विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीनंतर आयोजित सभेत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना आणि भूमिका प्रभावीपणे मांडल्या. विद्यार्थ्यांच्या मनोगतामुळे सभास्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले. कोमल गायकवाड, अदिती वाटवे, तसनीम म्हैस्कर यांच्यासह अनेकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज व्यक्त केली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला, विशेषतः विद्यार्थ्यांना, शांततामय आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी हर्षद साळवी, राजेश काफरे, राजेंद्र जाधव, रोशन देशमुख आणि ओंकार गुरव यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवत संविधानिक चौकटीत राहून आपला आवाज बुलंद करावा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायन करून केली. शांतता, शिस्त, लोकशाहीवरील विश्वास आणि देशप्रेमाचा संदेश देणाऱ्या या तिरंगा रॅलीला रोहा शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांप्रती समाजाची एकजूट आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित झाली.
लोकशाही मूल्यांचा गौरव
सहभागींच्या हातात तिरंगा ध्वज फडकत देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विशेष म्हणजे, या रॅलीत कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे किंवा पक्षीय घोषणा देण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, संविधानिक मार्गाने झालेल्या संघर्षाचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.







