रमजान निमित्ताने खजुराची आवक वाढली

शंभर पासून दोन हजार रु. प्रति दराने विक्री
। महाड । वार्ताहर ।
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिना सध्या सुरु असल्याने या महिन्यात ज्या फळाला सर्वाधिक मागणी अशा खजुराची आवक महाड बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सुमारे १०० रुपये पासून २००० किलोपर्यंतचा खजूर बाजारात मिळत असला तरी वाढत्या महागाईत गोरगरीबांसाठी मात्र खजुराची गोडी आंबटच जाणवत आहे. मुसलीम धर्मात पवित्र गणल्या गेलेला रमजान महिना सध्या सुरु आहे. या महिन्यात धरल्या जाणाऱ्या रोजांचा उपवास सोडताना घेण्यात येणाऱ्या आहारात खजूराला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे रमजान सुरवात होण्याआधीच खजुराची मोठी आवक बाजारात झाली आहे. मुळातच खजूर हा अरब राष्ट्रात सर्वाधिक घेतले जाणारे पिक आहे. वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने राजस्थान मध्ये देखील कांही प्रमाणात खजूर पिक घेतले जाते. मात्र इराक, इराण, मस्कत, सौदी अरेबिया या ठिकाणाहून आलेल्या खजुराला मागणी आहे. या खजुरातील “अजवा” या प्रकाराला अधिक मागणी असून याची किमंत देखील १८०० ते २००० प्रती किलो पर्यंत आहे. इराक मधून आलेला झाहीदी, इराण मधील इलिन, मझाफाती याचबरोबर मस्कत मधील फरद, आणि सौदी मधील अजवा, मबरूम, सुक्कारी, सूगाई, आदी प्रकार बाजारात पहावयास मिळत आहेत.
महाड तालुक्यात ग्रामीण भागात आणि शहरात मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव असून रमजान मध्ये धरण्यात येणारे उपवास सोडताना घेतल्या जाणाऱ्या आहारात खजूर आणि खजुराच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पदार्थांना मागणी असते. त्याचप्रमाणे खजुराला धार्मिक महत्व आहे,त्या मुळे रमजान मध्ये खजूराला तितकेच महत्व आहे. साधारणपणे महाड शहरात बाजारात किमान ५० टन खजूर विक्री झाला असावा असे खजूर विक्रेते मुनाफ करबेलकर यांनी सांगितले. जगातल्या प्रमुख पिकात खजुराची गणना केली जाते. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इराक, स्पेन, इटली, चीन अमेरिका आदी भागात कमीअधिक प्रमाणत हे पिक घेतले जाते. वाळवंटी आणि शुष्क भागात हे पिक उत्तम रित्या येते. पौष्टिक आणि उत्तम प्रतिकारशक्ती वाढवणारे फळ म्हणून खाजुराकडे पहिले जाते. आतड्यातील जंतूंची वाढ थांबवण्याचे काम खजूर करते. हृदयासाठी खजूर उत्तम औषध आहे. जीवनसत्व अधिक प्रमाणात खजुरात आढळून येतात. यामुळे औषधीय गुण असलेल्या खजुराची मागणी या दिवसात अधिक आहे.

खजूर रमजान महिन्यात उपवास सोडताना घेतला जातो. यामुळे रमजान मध्ये खजुराला मागणी आहे. विविध जातीचा खजूर बाजारात सद्या उपलब्ध आहे – रशीद कालसेकर (बुरहान स्टोअर महाड)

Exit mobile version