कोलाडमध्ये रानभाज्यांची आवक वाढली

। रोहा । वार्ताहर ।

पावसाळी हंगामात डोंगरमाथ्यावर तयार होणार्‍या रानभाज्यांची आवक कोलाडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली असून या भाज्यांना खवय्यांची चांगली पसंती मिळत आहे.

आयुर्वेदिकद्रुष्ट्या या भाज्या अत्यंत लाभदायक ठरत असल्याने या भाज्यांची विक्री हातोहात होताना दिसत आहे. त्यामुळे आदिवासी भगिनींना आपल्या हक्काचे उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले आहे. संधीवात, मधूमेह व पोटाचे विकारांवर या लाभदायक ठरत असल्याचे आयुर्वेद तज्ञांचे मत आहे. या भाज्या पावसाच्या आगमनाबरोबर लगेचच जमिनीवर नैसर्गिक पद्धतीने उगवत असल्याने यांचे सेवन केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. टाकळा, भारंगा, कुडा, शेवळा, अळूची पाने व भोवतीची पाने, करटोळी आदी रानभाज्या सध्या विक्रीसाठी आणल्या जात आहेत. तसेच, बेसुमार होत चाललेली जंगलतोड, जंगलात लावले जाणारे वणवे यामुळे रानभाज्या शोधण्यासाठी खुप वेळ जातो. घरची मुले व पुरुष रानोमाळ भटकून रानभाज्या गोळा करतात तर आम्ही महिला बाजारात त्यांची विक्री करीत असल्याची माहिती येथील विक्रेत्या महिलेने दिली.

Exit mobile version