शेती कमी होत असल्याचा परिणाम
| पाताळगंगा | वार्ताहर |
रायगड हे भाताचे कोठारे म्हणून प्रचलित असून, सध्या याच शेतीला औद्योगिकरणाचे ग्रहण लागले असल्यामुळे भातशेती कमी होत चालली आहे. शेती अल्प असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती न करता यंत्राच्या सहाय्याने शेती केली जाते. परिणामी, शेतकर्यांजवळ असलेल्या गुरे कमी प्रमाणात झाल्यामुळे लाकडी माच बनवून त्यावर पेंढा साठविण्याची कला लुप्त होत चालली आहे.
पूर्वी शेती ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकर्याजवळ गुरे ही खूप असायची. मात्र, गेल्या काही वर्षात औद्योगिकरण तसेच शेतीचे विभाजन झाल्यामुळे शेती ही तुकड्यामध्ये विभागली गेली. त्यातच मुंबईसारख्या धनिकांनी आपली जमीन घेऊन त्या ठिकाणी बंगले बांधले आहेत. परिणामी, लागवडीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यातच सातत्याने बदलत असलेले हवामान यामुळे मातीत टाकलेला पैसा मिळत नसल्याची खंत शेतकरी करीत आहे. यामुळे शेतीलागवड करण्यापेक्षा ती ओसाड पडत चालली आहे.
शेती करणे म्हणजे पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे असते. मात्र, आता विभक्त कुटुंब उदयास आल्यामुळे एकट्या व्यक्तीला शेती करणे अशक्य होत आहे. त्याचबरोबर शेती नाही तर गुरे नाही. यामुळे पेंढा जमा साठविण्याचे प्रकार बंद झाले. मात्र, आजही ग्रामीण भागात लाकडी माच रचून पेंढा साठविण्याची पद्धत ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी अनुभवास मिळत आहे.