हुडको लिमिटेडकडून शेलू शाळेला मदत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत आता सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. जिल्हा परिषद शाळेसाठी हुडको कंपनीचे सामाजिक बांधिलकी निधीमधून एक लाख दहा हजारांचा निधी देण्यात आल्या आहे.
शेलू या गावातील विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा चालविली जाते. 300 हून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक घेत असून, दुमजली इमारतीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्या शाळेत येणारे विद्यार्थी हे आपल्यासोबत घरातून पाण्याची बॉटल आणत असतात. मात्र, काही विद्यार्थी हे अशुद्ध पाण्यामुळे आजारी पडत असल्याचे आढळून आले आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक अनंत खैरे आणि माजी शिक्षक राजेंद्र धोत्रे तसेच सुनील जाधव यांनी शेलू शाळेसाठी हुडको कंपनीकडे शुद्ध पाण्याची सोय व्हावी म्हणून शब्द टाकला होता. त्यानंतर हुडको कंपनीकडून सामाजिक बांधिलकी निधीमधून शुद्ध पाण्याची व्यवस्था करता येईल काय? याबाबत पाहणी करण्यात आली. त्यानंतर हुडको कंपनीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून एक लाख दहा हजार रुपये खर्च करून पाणी शुद्ध करणारी यंत्रणा शाळेच्या आवारात बसवून घेण्यात आली. त्यासाठी हुडको कंपनी कडून कंपनीचे सहव्यवस्थापक प्रवीण के के तसेच सहायक व्यवस्थापिका प्रगती जाधव, व्यवस्थापक विद्याधर मोकाशी यांनी शेलू गावात येऊन पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा बसवून घेतली. हुडको कंपनीचे शाळेचे मुख्याध्यापक खैरे यांच्याकडून आभार मानण्यात येत असून, या उपक्रमाबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना आता पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे.