| पुणे | वृत्तसंस्था |
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे. दरम्यान, उद्यापासून (शनिवार 11 नोव्हेंबर) महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे. तर दुपारचे कमाल तापमान सामान्य राहून हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.मुंबईसह संपूर्ण कोकणात उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यात तर पुढील पाच दिवसही म्हणजे गुरुवार 16 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
येत्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात चक्रीय वाऱ्याची स्थितीतून जरी कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची शक्यता असली तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात मात्र कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही. तर 17 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.मागील दोन दिवसापासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस बरसत आहे. पुढील दोन दिवसही या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात पडत असलेल्या पावसामुळं आंबा पिकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतकरी देखील चिंतेत आहे.
पुण्यात अवकाळीची मुसळधारशुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान पुण्यातील बिबवेवाडीमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुणे आणि परिसरात पाऊस बरसत असून मराठवाड्यामध्येदेखील ढग दाटून आलेले आहेत. पुण्यात ऐन दिवाळीत पुण्यात पाऊस कोसळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सिंहगड रस्ता, धायरी, वडगाव परिसरात मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वहतूक विस्कळीत झाली. पुण्यामधील शिवाजी नगर, विद्यापीठ परिसर, बाणेर रोड, औंध, पाषाण या भागामध्ये सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली.