हल्लेखोर कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही; अनिल परब

। मुंबई । वृत्तसंस्था ।
गेले पाच महिने एसटी कामगारांचा संप सुरु आहे. विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. परवा दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. हातात दगड आणि चपल्ला भिरकावत त्यांनी पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर कूच केली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. यासंदर्भात आता एक महत्त्वाची बातमी आली आहे. शरद पवार यांच्या घरातील आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले त्यांना सेवेत घेणार नाही, अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे की, येत्या 22 तारखे पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. 22 तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. 22 तारखे पर्यंत कामगार कामावर आले नाहीत तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार ही केला जाईल. 5 महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस अगाराने पूर्ण बसेसची तपासणी केली आहे. एस टी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Exit mobile version