नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे दिग्गजांचे लक्ष

| माथेरान | वार्ताहर |
नुकताच प्रभागनिहाय ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपद हे यावेळेससुद्धा थेट जनतेतून असल्यामुळे प्रमुख पक्षातील दिग्गजांचे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे लक्ष केंद्रित झाले आहे. क वर्ग नगरपरिषदेच्या या ठिकाणी संपूर्ण दहा प्रभागांत मिळून जवळपास 4363 इतकीच मतदार संख्या आहे. कमी मताधिक्य असतानादेखील माथेरानमध्ये होणार्‍या या नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणूनच पाहिले जाते.

येथील राजकीय दृष्टीने कार्यरत असणार्‍या पक्षांमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप हेच पक्ष खर्‍या अर्थाने नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असणार आहेत. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कोणताही पक्ष यावेळी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे युत्या, आघाड्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एका गटाने अगोदरच शिवराष्ट्र पॅनल केले असल्याने या पॅनेलमधून अजय सावंत किंवा प्रसाद सावंत हे नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार असण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या दुसर्‍या गटाशी युती केल्यास काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आणि माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे हे दावेदार असू शकतात. त्यातूनही जर का ही युती झाली नाही, तर शिवसेनेच्या या दुसर्‍या गटाचे चंद्रकांत चौधरी हेसुद्धा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. भाजप काँग्रेस पक्षाशी युती करू शकते. अन्यथा स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊन माजी नगरसेवक प्रदीप घावरे यांना उमेदवारी देऊ शकते, असेही चित्र आहे. त्यामुळे वेळप्रसंगी नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही.

Exit mobile version