जिल्हा सरकारी रुग्णालयाचे ऑडिट रखडले
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा नियोजन समितीमार्फत कोरोना कालावधीत, तसेच गेल्या दहा वर्षांत जिल्हा सरकारी रुग्णालयाचे सुशोभिकरण आणि डागडुजीसाठी करण्यात आलेल्या खर्चाचे ऑडिट करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला होता. मात्र, अद्याप याबाबत कोणतीच ठोस कार्यवाही झाली नसल्याने पालकमंत्र्यांनी दिलेली बाष्फाळ आश्वासन हवेत विरली आहेत.
रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असतात. 1982-83 मध्ये अलिबाग येथे इमारत उभारण्यात आली. आता जुन्या इमारतीला 42 वर्षे झाली आहेत. सरकारी रुग्णालयाच्या इमारतीच्या डागडुजीचे काम सातत्याने करण्यात येत असल्याने हा मुद्दा चर्चेत येत आहे. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. तसेच या आधीच रॅम्प पाडून तो नव्याने बांधण्यासाठी सुमारे 25 लाख खर्च करण्यात येत आहेत. काहीच वर्षांपूर्वी सरकारी रुग्णालयाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली तब्बल 11 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा डागडुजीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
रायगड जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उभारलेली जिल्हा रुग्णालयाची इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. समोरुन इमारत चांगली दिसत असली, तरी इमारतीच्या आतील आणि मागील बाजू भयावह स्थितीमध्ये असल्याचे दिसून येते. नवीन इमारत उभारण्याचे सोडून डागडुजीचा पर्याय शोधला जात असल्याने ठेकेदारांना पोसण्यासाठीच डागडुजी आणि सुशोभिकरणाचा पर्याय वापरला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला होता. गेल्या दहा वर्षांपासून विविध कारणांनी आतापर्यंत सुमारे 13-14 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता पुन्हा असा खर्च करु नका, असे पत्र त्यांनी संबंधित प्रशासन आणि सरकारला दिले होते. तसेच मध्यंतरी जिल्हा नियोजन समितीमार्फत कोरोना कालावाधीत करण्यात आलेल्या खर्चाचे ऑडिट करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला होता. त्यामुळे बऱ्याच गोष्टी यातून उघड झाल्या असत्या. परंतु, अद्यापही याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पालकमंत्री कोणाला पाठीशी घालत आहेत, असा सवाल सावंत यांनी आता केला आहे.
याप्रकरणी अद्याप कोणतीही चौकशी समिती नेमण्यात आलेली नाही. तसेच याबाबत चौकशी करण्यात येत आहे, असे कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी कृषीवलशी बोलताना दिली. याप्रकरणी अधिक माहिती घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.