| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामात चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) परवानगी दिली आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर, लाळेच्या वापरावर घालण्यात आलेले निर्बंध उठविणारी ‘आयपीएल’ ही क्रिकेटविश्वातील पहिलीच स्पर्धा ठरणार आहे.
‘आयपीएल’च्या आगामी हंगामाला शनिवारपासून (दि.22) सुरुवात होणार असून, त्याआधी दहाही संघांच्या कर्णधारांची गुरुवारी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत कर्णधारांनी ‘बीसीसीआय’च्या प्रस्तावास मान्यता दिली. ‘‘चेंडूवर लाळेचा वापर करण्यास घालण्यात आलेली बंदी आता उठविण्यात आली आहे. ‘आयपीएल’मधील काही कर्णधार या निर्णयाच्या पक्षात नव्हते, तर काही साशंक होते. मात्र, बहुतांश कर्णधारांनी या प्रस्तावास पाठिंबा दर्शविल्याने आता चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करता येणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले. चेंडूला लकाकी आणण्यासाठी पूर्वीपासून लाळेचा वापर करण्यात येत होता. मात्र, करोनाकाळात आरोग्यविषयक खबरदारी म्हणून चेंडूवर लाळेचा वापर करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. पुढे 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हा निर्णय कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर, ‘बीसीसीआय’नेही ‘आयपीएल’साठी असाच नियम केला होता. ‘आयपीएल’मधील सर्व संघांच्या कर्णधारांची मुंबई येथील ‘बीसीसीआय’च्या मुख्यालयात गुरुवारी बैठक झाली. ही बैठक दुपारी 12.30 वाजता नियोजित होती. मात्र, काही संघांच्या अधिकाऱ्यांना येण्यास विलंब झाल्याने बैठक उशिराने सुरू झाली. या बैठकीत आगामी हंगामाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लाळेवरील बंदी उठविण्याचा प्रस्ताव ‘बीसीसीआय’कडून ठेवण्यात आला आणि त्याला बहुतांश कर्णधारांनी पाठिंबा दर्शविला. आता ‘बीसीसीआय’च्या या निर्णयामुळे ‘आयसीसी’लाही आपल्या नियमाबाबत पुनर्विचार करावा लागू शकतो.