। पुणे । प्रतिनिधी ।
हिंजवडी येथे बुधवारी सकाळी टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर सहा जण जखमी झाले. मिनी बसला लागलेली ही आग घातपात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गाडीला स्वतः चालकानेच केमिकल आणून आग लावून दिली. याशिवाय गाडीचा भडका उडण्यापूर्वी त्याने गाडीतून खाली उडी मारल्याची माहितीदेखील समोर येत आहे.
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांडाचा उलगडा झाला असून गाडीचा चालक जनार्दन हंबर्डेकर याने घातपात रचून, आपल्याच कंपनीतून केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीटखाली ठेवले होते. तसेच, कापडाच्या चिंध्याही ठेवण्यात आल्या होता. त्यानुसार, प्लॅन करुन त्याने टेम्पोचा स्फोट घडवून आणला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली. टेम्पोचालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी वाद होता. त्याचा पगारही त्याला मिळालेला नव्हता, त्याला ड्रायव्हर व्यतिरिक्त इतर मजुरीची कामे दिली जात होती. त्यातून, त्याचा 3 ते 4 जणांवर राग होता, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
तसेच, चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी अन 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.