| चिपळूण | प्रतिनिधी |
शहरातील बावशेवाडी परिसरातील वाढत्या कचरा समस्येवर उपाय म्हणून एका तरुणाने राबवलेल्या अनोख्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बावशेवाडी येथील आकाश कांबळे या सामाजिक भान असलेल्या युवकाने गुहागर बायपास मार्गावरील रस्त्याशेजारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याची वारंवार तक्रार केली जात होती. वारंवार विनंती करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने यावर नामी शक्कल म्हणून आकाशने याठिकाणी ‘मी गाढव आहे, कचरा येथेच टाकणार’ अशा आशयाचा बॅनर लावला आहे. त्यामुळे याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना जणू चांगली चपराकच बसली आहे.
अनेकदा समज देऊनही काही नागरिकांनी याठिकाणी कचरा टाकण्याची सवय सोडली नव्हती. अखेर स्वतः पुढाकार घेत आकाशने स्वखर्चातून जेसीबीच्या मदतीने रस्त्यालगत साचलेला कचऱ्याचा ढीग हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. परंतु स्वच्छता मोहिमेनंतरही काही बेफिकीर लोक पूर्वापार सवयीप्रमाणे पुन्हा त्या जागीच कचरा टाकू लागले. वारंवार विनंती करूनही परिस्थितीत सुधारणा दिसत नसल्याने आकाशने नागरिकांना चाप बसेल अशा पद्धतीने जाणीव करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘मी गाढव आहे. मी इथेच कचरा टाकणार’ असा मुद्दाम टोमणेबाज व उपरोधिक आशय असलेला मोठा बॅनर त्याने त्या ठिकाणी लावला. या बॅनरवर कचरा टाकणाऱ्यांना जागृतीचा संदेश देत दंडाचीही सूचना करण्यात आली आहे. हा बॅनर पाहताच अनेक नागरिकांमध्ये मजेशीर चर्चा असून सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे.
स्वच्छतेसाठी अशा धाडसी पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल आकाश कांबळेचे स्थानिकांसह विविध सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे. लोकांनी शिस्त पाळावी, रस्त्यावर कचरा न टाकता नगरपालिका घंटागाडीत कचरा द्यावा, यासाठीच हा प्रकार केला, असे आकाशने सांगितले.







