दुर्घटना टाळण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर सूचना फलक
| रायगड | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शैक्षणिक सहलींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अशा सहली दरम्यान सुरक्षितता, शिस्त व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. रायगड जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांवर सातत्याने शैक्षणिक सहली येत असतात. या विद्यार्थांना समुद्रात उतरण्यापूर्वी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबतचा सूचना फलक समुद्रकिनाऱ्यावर लावण्यात येणार आहेत.
समुद्रकिनारी सहलीसाठी आल्यानंतर विद्यार्थ्यांना पाण्यात उतरण्यास मनाई असणार आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज नसल्याने विद्यार्थी बुडण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मागील आठवड्यात काशिद येथे खासगी क्लासची सहल घेऊन आलेले एक शिक्षक आणि एक विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी पुणे येथील इनामदार महाविद्यालयाचे 13 विद्यार्थी मुरूडच्या समुद्रात बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हापासून अशा घटना टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. सुरक्षिततेस प्राधान्य, नियोजनात विद्यार्थ्यांची संख्या, वयोगट, मार्ग, निवास, भोजन, आपत्कालीन संपर्कव्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा यांची काळजीपूर्वक आखणी करावी. शिक्षक व सहलीतील मार्गदर्शकांना जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिलेले असावे, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.






