भक्तांचा बाप्पा करतोय अर्थव्यवस्था मजबूत

परकीय चलन मिळवून देण्यात पेण मूर्तीकारांचे योगदान

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्यातील गणेशमूर्ती निर्मितीचे माहेरघर असलेल्या पेणमधील गणेशमूर्तींना पुणे, मुंबई, ठाण्यापासून ते थेट सातासमुद्रापार अमेरिका, कॅनडा, नेदरलँंडमध्ये मोठी मागणी असते. यंदाच्या वर्षी देखील रायगडातील बाप्पा हा भक्तांच्या घरी पाहुणा म्हणून जाण्यासाठी सज्ज होत आहे. यासाठी पेणमधील गणेशमुर्ती कारखान्यांमध्ये कारागीरांची चांगलीच लगबग सुरु असल्याचे दिसत आहे. 400 कोटी रुपयांची उलाढाल असणार्‍या या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन मिळवून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे जिल्ह्याची आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी पेणमधील मूर्तीकारांचे योगदान आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात पेणमधील काही मोजक्याच कलाकारांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर अल्पावधीतच तो भरभराटीस आला. आता तर देशातच नव्हे, अमेरिका, इंग्लड, सिंगापूर येथेही पेणच्या मूर्तींना प्राधान्याने मागणी आहे. पेण शहरात 450 ते 500 कार्यशाळांमधून दरवर्षी 12 ते 15 लाख गणेशमूर्ती घडविण्यात येतात. तसेच हमरापूर, जोहे, तांबडशे, कळवे या विभागात 900 कार्यशाळांमधून सुमारे 18 लाख गणेशमूर्तींची निर्मिती होते. एक फुटापासून 12 फूट उंचीच्या मूर्ती निर्माण करणारे हे कारखाने आहेत. मूर्ती निर्मिती हा पेणमध्ये वर्षभर चालणारा व्यवसाय. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या शोधात दुसरीकडे धाव घेण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे सरकारला यासाठी एक पैसाही निधी खर्च करावा लागत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करावी लागत नाही. येथील कारखानदार स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आत्मनिर्भर झालेले आहेत.

वर्षभर येथे काम सुरु असले तरी, खर्‍या अर्थाने जूनपासून या कार्यशाळांमध्ये अत्यंत वेगाने रात्रंदिवस काम सुरू होते. कामात महिला-पुरुष असा भेदभाव अजिबात बाळगला जात नाही. विशेष म्हणजे काही लहान मुले देखील बाप्पाच्या मुर्ती घडवण्यासाठी आपले योगदान देत असतात. सरासरी एका कार्यशाळेत 10-15 कामगार काम करतात. वर्षभर दहा हजार कामगार कायमस्वरूपी काम करत आहेत. यंदा पेण तालुक्यात गणेशमूर्ती निर्मितीचे 35 लाख उद्दिष्ट सफल झाले आहे. पेण, हमरापूर, कळवा, जोहा, तांबडशेत, दादर, रावे, सोनकार, उरनोळी, हणमंतपाडा, वडखळ, बोरी, शिर्की या गावांमध्ये आहेत मूर्ती कार्यशाळा. गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, हैदराबाद, अमेरिका, नेदरलँड, लंडन, दुबई, न्यूयॉर्क, कॅनडा, सिंगापूर आदी देशांत मूर्ती होतात रवाना.

Exit mobile version