पुढील लक्ष्य पॅरिसकडे- सिंधू
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लढाई अजून संपलेली नाही. मी आनंदी आहे आणि मला वाटतं मी चांगली खेळले. देशासाठी पदक जिंकणं हे नक्कीच अभिमानास्पद आहे, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं असलं तरी आपलं लक्ष्य आता 2024 सालच्या पॅरिस ऑलिम्पिककडे असल्याचा निर्धार भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने केला आहे.
पदक विजेत्या सिंधूचे नुकतेच भारतात आगमन झाले आहे.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी चांगली कामगिरी करुन सुवर्ण पदक जिंकण्यासाठीचं लक्ष्य डोळ्यासमोर नक्कीच आहे, असं सुचित केले. सलग दोनवेळा भारतासाठी ऑलिम्पिक पदकाची कमाई करणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. सिंधूच्या विजयानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पदक जिंकल्यानंतर सिंधूनं दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेनंही सर्वांची मनं जिंकली आहेत.
देशासाठी तुम्ही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर पदकाची कमाई करता तेव्हा खूपच आनंद वाटतो. पण सुवर्ण किंवा रौप्य पदकाची कमाई करू शकले नाही याचा खेद व्यक्त करू की आजच्या विजयाचं सेलिब्रेशन करू हे कळत नाही.
पी.व्ही.सिंधू,बॅडमिंटनपटू