। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील पुरस्कारप्राप्त नारंगी ग्रामपंचायतीची लाखो रुपयांची कचरा उचलणारी घंटा गाडी जळून खाक झाली आहे. उघड्यावर पार्क केलेल्या या घंटा गाडीला मंगळवारी (दि.11) मध्यरात्री गावातील अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी उत्तम स्टील कंपनीने सीएसआर फंडातून लोकसेवेसाठी नारंगी ग्रामपंचायतीला घंटागाडी दिली होती. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या घंटा गाडीची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार व निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, नारंगी ग्रामपंचायतीकडे मोठे कंपाउंड, गेट आणि सीसीटीव्ही सुरक्षेची सुविधा असूनही गाडी रस्त्यावर उभी का होती? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. जर गाडी सरकारी आवारात सुरक्षित ठेवली असती, तर आज हे संकट टळले असते. ग्रामपंचायत प्रशासन दोषी कर्मचार्यांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर हलगर्जीपणाबाबत कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.