केबलसाठी खणलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरात सध्या जीओ फायबर केबल टाकण्याचे काम जोरात सुरू असून, रस्त्यांवर दोन खड्डांमध्ये दोनशे ते अडीचशे मीटर अंतर ठेवून बारा फुट खोलीचे खड्डे खणण्यात आले आहेत. या खड्ड्यात दुचाकी कोसळून दोघे जण जखमी झाले आहेत.
खड्डा खणून झाल्यानंतर बाजूला कुठल्याही प्रकारचे बॅरिकेट्स, रिबीन, पांढरा रंग लावलेले दगड ठेवण्याची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे शनिवार (दि.22) रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास चौकर पाखाडी येथील रहिवासी अनिकेत बाक्कर हे आपल्या बाईक वरून आईला घरी नेताना काळोखात खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे बाईक सह दोघं बारा फुट खोलीच्या खड्ड्यात पडल्यामुळे दोघांना डोकं, मनगट व गुडघ्याला मार बसला आहे. बाईकचे ही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराच्या चुकीमुळे अनिकेत व त्याच्या आईला नाहक वैद्यकीय खर्च झाला असून, ठेकेदाराने वैद्यकीय खर्च व बाईकची झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version