प्रवास बनला धोकादायक
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक राज्यमार्ग व जिल्हामार्गाचे रुंदीकरण झाले. मात्र, गेली कित्येक वर्ष श्रीवर्धन – बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग अरुंद असून अनेक खोदकामामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखल झाल्याने प्रवासाकरीता धोकादायक ठरत आहे. श्रीवर्धन – बोर्ली मार्ग हा 17 किमी अंतराचा घाट आणि वळणावळणाचा मार्ग आहे. यामधील बोर्ली ते दांडगुरी दरम्यानचा अंदाजे चार किलोमीटर रस्ता अरुंद असून, याची रुंदी आठ ते दहा फुट एवढीच आहे. त्यात रस्त्याच्या साईडपट्टीला नेटवर्क केबलसाठी खोदकाम केल्याने सर्व रस्ता चिखलाने माखलेला आहे.
सध्या तुरळक पावसाची ये – जा सुरू आहे. त्यामध्ये या मार्गात पावसाळी संपूर्ण रस्त्यावर चिखल व केबलच्या कामासाठी केलेल्या खड्ड्यांचा धोका पाहता वाहनांचा प्रवास मोठा जिकरीचा ठरत आहे. दुचाकी, रिक्षा अशा वाहनाना प्रवास करताना समोरून येणाऱ्या अवजड वाहनाना साईड देतेवेळी रस्त्याच्या खाली किती उतरायचे यावरून ये जा करणाऱ्या दोन्ही वाहन चालकामध्ये पदोपदि वाद होण्याच्या घटना घडतच असतात. त्यामुळे साईडपट्टीच्या खड्ड्यात रुतल्याची भीती कायम आहे. याठिकाणी अरुंद रस्ते व तीर्व उतार असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने येतात आणि अचानक अरुंद रस्ता असल्यामुळे वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडबडतात. अशावेळी अपघातालाहि सामोरे जावे लागते. रस्त्यांच्या या ठिकाणी साईड पट्टी खचल्याने व पडलेल्या खड्ड़यामुळे दुचाकी वाहनचालकांचे वारंवार अपघात घडत आहे. मागील दिवसात किमान सहा ते सात जण वाहने घसरून जखमी होत असल्याची परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहने चालावी लागत आहे. प्रवासात आणखी कोणता अनर्थ घडू नये म्हणून रस्त्याची डागडुजी व रुंदीकरण करणे गरजेचे आहे. अशी मागणी प्रवाशी व वाहन चालकांकडून होत आहे.
या मार्गाच्या कामासाठी टेंडर निघापी असून लवकरच तीन ते चार किलोमीटर अंतराचे रुंदीकरण होईल.
तुषार लुंगे, बांधकाम अधिकारी