| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पक्षाचा व्हीप झुगारुन बंडखोरी करणाऱ्या पालीच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांच्यासह चार नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
पाली शहरात अवघ्या दीड वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या नगरपंचायतीमध्ये अनेक स्थित्यंतरे व उलथापालथ घडत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पाली नगराध्यक्षा व चार नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश दिला. नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारल्याने शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी दपके व प्रतीक्षा पालांडे, शेकापचे नगरसेवक विनायक जाधव व नगराध्यक्षा प्रणाली शेळके हे चार जण अपात्र झाले आहेत. तर शिवसेनेचे सचिन जवके हे नगरसेवक तिसरे अपत्य असल्याने अपात्र झाले आहेत.
जानेवारी 2022 मध्ये पाली नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर येथे अनेक उलथापालथ होत आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपद रिक्त होते. या रिक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक विशेष सभेचे आयोजन करून 14 डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आली. यावेळी शेकापच्या प्रणाली पाटील-शेळके यांनी बंडखोरी करत पक्षाचा व्हीप झुगारून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांना 11 मते व शेकापचे आरिफ मणियार यांना 5 मते मिळाली आणि नगराध्यक्षपदी प्रणाली शेळके निवडून आल्या.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना व शेकापने आपल्या पक्षातील नगरसेवकांना व्हीप (पक्षादेश) काढला होता. मात्र, शिवसेनेच्या चार नगरसेवकांपैकी दोघांनी व्हीप झुगारून प्रणाली पाटील-शेळके यांना, तर दोघांनी आरिफ मणियार यांना मतदान केले. तर शेकापच्या तीनपैकी दोघांनी व्हीप झुगारून प्रणाली शेळके (यामध्ये प्रणाली शेळके स्वतः) यांना, तर एकाने आरिफ मणियार यांना मतदान केले होते. त्यानंतर हे प्रकरण रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यावर जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी (दि.4) या चार नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश दिला. दरम्यानच्या काळात नगरसेविका कल्याणी दपके यांनी नगरसेवक सचिन जवके यांच्याविरोधात तीन अपत्य असूनही निवडणूक लढविल्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यानुसार चौकशी व सुनावणीनंतर सचिन जवके यांच्या अपात्रतेचा आदेशसुद्धा जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिला. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पाली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या येरूनकर यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.