सात ब्रास बँड पथकांकडून अभिवादन; आगरी समाज भूषण पुरस्काराचे होणार वितरण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेले क्रांतिकारक हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची 112 वी जयंती सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. या जयंती सोहळ्याचे आयोजन मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे करण्यात आले असून, कर्जत तालुका आगरी समाज संघटना व मानिवली हुतात्मा स्मारक समिती फाऊंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे.
हुतात्मा हिराजी पाटील यांचा जन्म 19 जानेवारी 1914 रोजी झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आगरी समाज भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, कर्जत तालुक्यातील सात ब्रास बँड पथक आपल्या सादरीकरणातून हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत.
या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री व आगरी समाजाचे प्रमुख नेते जगन्नाथ पाटील, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, नवी मुंबई आगरी-कोळी फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील, तालमणी पंडित प्रतापबुवा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावर्षीचा हुतात्मा हिराजी पाटील आगरी समाज भूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, कर्जत तालुक्यातील तुकाराम कोळंबे (मरणोत्तर) व सावळाराम ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष नागो गवळी, सावळाराम जाधव, एकनाथ धुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या जयंती सोहळ्यात मानिवली येथील जय चेरोबा बँड, श्री गणेश बँड, शेलू येथील जय जिरोबा बँड, पोशीर येथील श्री हनुमान बँड, पिंपळोली येथील श्री गणेश बँड, बेकरे येथील श्री हनुमान बँड तसेच वडवली येथील एकविरा देवी बँड पथक यांचे सादरीकरण होणार आहे. याशिवाय समाजातील विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या तरुण-तरुणींचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे.






