| माणगाव | प्रतिनिधी |
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे भारतीय ऋतू निसर्गातील विविध बदलांची नांदी देतात. बारा महिन्यातील विभागून ऋतूूचक्र सांगणारे हे ऋतू निसर्गाची विविध रूपे समोर आणतात. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशिर्ष आणि पौष या महिन्यात शिशिर ऋतू असतो. डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध, जानेवारी महिना व फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्धात शिशिर ऋतू असतो. या ऋतूचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘झाडांची पानगळ’ सुरू झाली कि शिशिर ऋतू सुरू झाला असा जनमानसात समज आहे.
यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्याच्या 8 तारखेपर्यंत लांबलेल्या पावसाने निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलवून टाकले होते. मात्र, ठराविक काळानंतर येणारे ऋतूचक्र सतत सुरू असून शिशिर ऋतूने पानगळीला सुरूवात केली आहे. मोठ्या पानांच्या झाडांची पाने या ऋतूत गळतात. झाडे पूर्णपणे निष्पर्ण होतात. काहीसं भकास उदास असे माळरानाचे चित्र या ऋतूत दिसून येते. निसर्गाला नवे रूप देणारा हा ऋतू शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जातो.
जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात असणारा हा ऋतू थंडीचा ऋतू म्हणूनही ओळखला जातो. शिशिराची पानगळ झाली असून, झाडांची पाने पिवळीगर्द होऊन गळण्यास सुरूवात झाली आहे. काहीसा उदास वाटणारा हा ऋतू गारवा थंडी आणि पानगळ घेऊन येतो. या ऋतूतील सणही ऋतूमानाचा विचार करून आहार विहार देतात. मकरसंक्रात हा त्यातीलच महत्वाचा सण. उत्तम आरोग्यासाठी स्निग्ध पदार्थ खाण्याचा, थंडीचे कपडे, हलका व्यायाम आणि आरोग्यदायी आहार सांभाळून या ऋतूत आरोग्याची काळजी घेतली जाते.
झाडांची झालेली पानगळ शेतकऱ्यांना राब देऊन जाते. झाडांचा गळलेला हाच पालापाचोळा शेतकरी शेतीसाठी वापरतात. निसर्गाला नवे अंकूर देणारा जूनं जाऊ द्या मरणा लागूनी म्हणणारा हा ऋतू वसंताची चाहूल देतो. निष्पर्ण झालेल्या फांदीतून रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ याच ऋतूच्या अखेरीस पहावयास मिळतात. एका अर्थाने नवसर्जनास पार्श्वभूमी निर्माण करणारा विरक्तीचा संदेश देणारा हा ऋतू वसंताची चाहूल देतो. या ऋतूतच रानोमाळ आंब्याच्या, काजूच्या मोहोराचा घमघमाट येत राहतो. करवंदीच्या जाळीमधून पांढरीशूभ्र फुले डोकावतात आणि पांगिरा, पळस, चाफा आदी. असंख्य झाडे पुष्पगुच्छांची बरसात करतात. या ऋतूच्या उत्तरार्धात सुरू होतो तो सृष्टीचे नवचैतन्य बहरणारा वसंत ऋतू आहे.
निसर्गाचे आगळेवेगळे रूप
सध्या मात्र रानावनात मोठ्या प्रमाणात पळस, करवंद आदी फुलांना मोठ्या प्रमाणात बहर येत आहे. हे दृश्य अतिशय सुंदर दिसत असून निसर्गाच्या या रूपाचे आगळेवेगळे रूप निसर्गप्रेमींना सुखावत आहे.







