बुडालेल्या ‘त्‍या’ तरुणाचा मृतदेह सापडला

सुधागड-दिघेवाडी येथील घटना

| पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील दिघेवाडी येथील तलावात पोहताना सोमवारी (दि.25) सायंकाळी योगेश पवार बुडाला होता. बचाव पथकाने प्रयत्न करूनही दोन दिवस मृतदेह सापडला नव्हता. बुधवारी सकाळी योगेशचा मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिघेवाडी आदिवासीवाडीवरील योगेश चिंतामणी पवार (25 ) हा आपल्या दोन मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला होता. तीन मित्रांपैकी एक जण तलावाच्या काठावर बसला होता. योगेश व त्याचा दुसरा मित्र तलावात पोहण्यासाठी उतरले. दुसरा मित्र देखील पोहताना अर्ध्यातून परत काठावर आला, मात्र योगेशने आपले पोहणे सुरु ठेवले होते. पोहत पुढे जात असताना योगेश तलावाच्या पाण्यात बुडाला. योगेशच्या मित्रांनी तातडीने पाली पोलिसांना संपर्क करून घडलेली हकीकत सांगितली. पाली पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व स्थानिक बचाव पथकाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथक आले, परंतु तोपर्यंत अंधार झाला आणि बचाव पथकाकडे तलावातील पाण्यात जाण्यासाठी कोणतीही साधनसामग्री नसल्याने बचाव पथक माघारी फिरले होते. पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांनी खोपोली येथील गुरुनाथ साठीलकर यांच्या बचाव पथकाला संपर्क साधला. मंगळवारी (दि.26) या बचाव पथकाने पाण्यात योगेशला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. बुधवारी (दि.27) योगेश पवारचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

Exit mobile version