म्हसळा | वार्ताहर |
तालुक्यातील मेंदडी येथील खाडीच्या पाण्यात 18 जुलैला बोट पलटी होऊन वाहून गेलेल्या मच्छिमाराचा मृतदेह राजपुरी येथील खाडी पात्रात सापडला आहे. सुरेश हरेश पायकोळी (वय 42) असे या मृत मच्छिमाराचे नाव असून, तब्बल 48 तासांनी शोध पथकाला आज (20 जुलै) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला.
मेंदडी गावातील मच्छिमार सुरेश पायकोळी खाडीच्या पात्रात वाहुन गेलेली बोट आणण्यासाठी दुसर्या एका लहान बोटीने गेला असताना, बोट पलटी झाली. पावसामुळे खाडीच्या पाण्याच्या प्रवाहात सुरेश पायकोळी वाहून गेला होता. तर त्याच्यासोबत असलेला मच्छिमार शशिकांत लक्ष्मण पाटील याने प्रसंगावधान राखल्याने तो वाचल्याचे सहायक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितले. दोन दिवसांपासून स्थानिक व साळुंखे रेस्क्यू टीम-महाड यांच्या मदतीने खाडी पात्रात बेपत्ता मच्छिमाराचा शोध सुरु होता. अखेर स्थानिक लोकांच्या मदतीने शोध घेतला असता सुरेश पायकोळीचा मृतदेह सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास राजपुरी खाडी पात्रात तरंगताना आढळून आला. या घटनेची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.