रेल्वे मार्गावर तरुणीचा घात की अपघात?

। नेरळ । वार्ताहर ।
ठाकुर्ली डोंबिवली भागात राहणारी कॉलेज विद्यार्थिनी आपल्या परीक्षेचा पेपर देण्यासाठी 11 एप्रिल रोजी घरातून निघाली होती. दादर येथे कॉलेजला जाणार्‍या या विद्यार्थिनीचा मृतदेह भिवपुरी रोड ते नेरळदरम्यान रेल्वे मार्गावर सापडला आहे. दरम्यान, मुंबईत कीर्ती कॉलेजला शिक्षण घेणारी ही तरुणी कर्जत मार्गावर कशासाठी आणि कधी पोहोचली होती, असा प्रश्‍न या अपघाताच्या निमित्ताने निर्माण झाला आहे.

डोंबिवली भागात राहणारी मंगला संतोष शिरोडकर ही तरुणी मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत होती.ती ठाकुर्ली स्थानकातून लोकलने दादर येथे शिक्षण घेण्यासाठी जात असे. सोमवार, 11 एप्रिल रोजी तिचा वाढदिवस होता. नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता ट्रेन पकडून कॉलेजला पेपर देण्यासाठी गेलेली मंगला सायंकाळी घरी परत आली नाही. त्यामुळे पालकांनी तेथील जवळच्या पोलीस ठाण्यात कळविले होते. मात्र, तिचा शोध घेऊन सकाळपर्यंत लागला नव्हता. मंगळवारी सकाळी आठ वाजता कर्जत येथून मुंबईकडे जाणार्‍या ट्रेनमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी आंबिवली पॉवर स्टेशनच्या पुढे रेल्वे मार्गावर मृतदेह पडल्याची खबर नेरळ स्थानकातील पोलिसांना दिली. त्यांनतर पोलीस तेथे पोहोचले आणि जखमी मंगला शिरोडकर यांना उचलून आणण्यात आले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी मंगला शिरोडकरला नेण्यात आले असता ती मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान, ठाकुर्ली-दादर असा रेल्वे पास बाळगणारी आणि त्या मार्गावर प्रवास करणारी मंगला हिच्या पर्समध्ये सीएसएमटी ते खोपोली असे तिकीट होते. त्यामुळे पालकदेखील चक्रावून गेले असून, ती तरुणी खोपोली मार्गावर कधी आणि कशी गेली. तसेच तिला भिवपुरी रोड-नेरळदरम्यान अपघात कसा घडला, असे अनेक प्रश्‍न या तरुणीच्या अपघाताच्या निमित्ताने पुढे आले आहेत. त्या तरुणीकडे खोपोलीचे तिकीट असल्याने पोलिसांना खोपोलीपासून सीसीटीव्ही तपासावे लागणार आहेत. त्यावेळीच या गुन्ह्याचा छडा लागणार आहे.

Exit mobile version