बोर्ली परिसर व्हायरल तापाने फणफणला

दिवसभर कडक उन्हाचा भडका तर रात्रीत थंडीचा चटका

| दिघी | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यात तापमान वाढ सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून दिवसभर सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकताना तर सायंकाळी थंडी पडताना दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे श्रीवर्धनमधील ग्रामीण भागात आजारांची लक्षणं दिसून येत आहे. मात्र, या दिवसात कोणते आजार होऊ शकतात आणि त्यांची काळजी कशी घ्यायची यापासून प्रत्येक जण दुर्लक्षित आहे.

गावाकडे उन्हाळा सुरू झाला आहे. हवामान बदलामुळे अनेक ठिकाणचे तापमान 40 अंशावर येऊन ठेपले आहे. उन्हाची तीव्रता सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत भयानक स्वरूपात जाणवू लागली आहे. तर रात्रीचे सर्वत्र जोरदार थंडीने हवामानातील बदल जाणवत आहे. यावेळी दैनंदिन कामात उन्हामुळे आणि घामाने सर्वच हैराण झालेले असताना उन्हाचे चटके आणि घामासोबतच उन्हाळा काही रोगांनाही सोबत घेऊन आला आहे. अशात आरोग्याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. जर या रोगांकडे लक्ष दिलं नाहीतर त्याचे गंभीर परीणाम होऊ शकतात.

शरीरात पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणे या दिवसात गरजेचे असते. रोज जवळपास 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. या दिवसात कमी पाणी पिणे आणि जास्त वेळ उन्हात राहणे यामुळे डिहायड्रेशनची समस्या होण्याची शकता अधिक असते. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगले. डॉक्टरांनुसार गरमीमुळे डोकेदुखी आणि मायग्रेन समस्या अधिक भेडसावू शकते. गरमीमुळे रक्तनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला होणारा रक्त पुरवठा कमी होतो. यात डोकेदुखी समोरच्या बाजूने सुरू होऊन मागच्या बाजूपर्यंत जाते. जास्त वेळ उन्हात घालवल्याने ही समस्या अधिक जाणवते.

असा जाणवेल आजार –
डिहायड्रेशनमुळे मेंदु, किडनी, मांसपेशी आणि ह्रदयाला नुकसान होऊ शकतं. चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं आणि तहान लागणं ही डिहायड्रेशनची लक्षणे आहेत.

इकडे पण लक्ष द्या –
जास्त ताप, अंगदुखी, घशात खवखवणे, सर्दी, डोकं दुखणे हे या रोगाची लक्षणं आहेत. हा त्रास तुम्हाला एक आठवडा होऊ शकतो.

काय काळजी घ्याल –
त्रास टाळण्यासाठी योग्य प्रमाणात हलक्या पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. या आजाराचे परीणाम अनेकदा गंभीर बघायला मिळतात.या दिवसात बाहेरील पदार्थ खाल्ल्याने हे आजार होण्याची शक्यता अधिक असते. पोटावर सूज येणे, पोट दुखणे, सतत टॉयलेटला जावं लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

रुग्णांची संख्या वाढली –
बोर्लीपंचतन प्राथमिक रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला या रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्या आठवड्याभरात या आजारांच्या रुग्णांची संख्या 250 असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळत आहे.

व्हायरल तापाची साथ सर्वत्र पसरत आहे. त्यामूळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी दक्षता म्हणून संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे.

डॉ. किशोर कोठूळे, वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक रुग्णालय बोर्लीपंचतन
Exit mobile version