बोर्लीपंचतन आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

रुग्ण व आरोग्य कर्मचारी असुरक्षित

| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या धोकादायक अवस्थेत असून, इमारतीच्या विविध भागांबरोबरच प्रसुतीगृहातील शौचालयाच्या छताच्या स्लॅबचे तुकडे खाली पडत आहेत. यामुळे प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची खोलीही धोकादायक स्थितीत आहे.

या आरोग्य केंद्रात दररोज गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक व आपत्कालीन रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, इमारतीची सद्यस्थिती पाहता कोणत्याही क्षणी एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा धोकादायक वातावरणात डॉक्टरांना उपचार करावे लागत आहेत. इमारतीच्या दुरवस्थेमुळे रुग्ण तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सन 2008/9 साली करण्यात आले असून, तेव्हापासून ही इमारत वापरात आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून भिंतींना भेगा पडणे, छतामधून पाणी गळणे, प्लास्टर निखळणे, तसेच काही ठिकाणी स्लॅबमधील सळ्या उघड्या पडल्या असून, मागील दोन-तीन महिन्यात हे प्रमाण खूप वाढले आहे. ऑक्टोबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान या इमारतीची थोडीफार डागडुजी करण्यात आली. परंतु, मुळ काम निकृष्ट दर्जाचे असल्याने या दुरुस्ती व रंगरंगोटीचा खर्च वाया जात आहे. तळमजल्यावरील बाह्यरुग्ण विभाग, प्रसुतीगृह, औषध भांडार, रक्त तपासणी विभाग हा थोडाफार सुस्थितीत असून, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम धोकादायक स्थितीत आहे. पुढील संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या इमारतीची संरचनात्मक तपासणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही होईपर्यंत आरोग्य कर्मचारी व रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टिने पर्यायी सुरक्षित इमारतीत आरोग्य सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची मी स्वतः पाहणी केली आहे. इमारतीच्या धोकादायक परिस्थितीबद्दल संरचनात्मक तपासणी करण्याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

-डॉ.संतोष नारायणकर
तालुका आरोग्य अधिकारी श्रीवर्धन

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत मला माहिती दिली आहे.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला इमारतीच्या संरचनात्मक तपासणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून तेथील आरोग्य सेवा इतर इमारतीमध्ये हलवीण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

-डॉ.आनंद गोसावी
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड

Exit mobile version