धक्कादायक! मुलगा आईच्या मृतदेहाजवळ चार दिवस राहिला बसून

। कल्याण । प्रतिनिधी ।

कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एक चौदा वर्षाचा मुलगा चार दिवस घरात आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. जेव्हा फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा भागातील एका उच्चभ्रू वस्तीमधील गृहसंकुलात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सिल्व्हिया डॅनिअल (44) असे मृत महिलेचे नाव आहे तर, आल्विन डॅनिअल (14) असे मुलाचे नाव असून तो मानसिक रित्या कमजोर आहे. बुधवारी या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने त्रास होऊ लागला. ही दुर्गंधी कोठून येते याचा तपास शेजारी करू लागले. त्यावेळी संकुलाचा रखवालदार आणि शेजाऱ्यांनी डॅनिअल यांचा दरवाजा खूप वेळ ठोठावला. अल्विन याने दरवाजा उघडताच दुर्गंधी येऊ लागली. शेजारी डॅनिअल यांच्या घरात जाताच त्यांना सिल्व्हिया या मृत अवस्थेत आणि त्यांचा मृतदेह सडला असल्याचे दिसले. शेजाऱ्यांनी ही माहिती तात्काळ खडकपाडा पोलिसांना दिली.

पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गतिमंद मुलाची चौकशी केली असता त्याची आई आजारी असल्याचे समझले. त्या आजारातून महिलेचा मृत्यू झाल्याचे आणि यात संशय घेण्यास वाव नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार कशामुळे घडला हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version