पाच वर्षापासुन बेपत्ता असलेल्या मुलाची आई-वडिलांशी झाली गाठभेट

| पनवेल | साहिल रेळेकर |
पाच वर्षापासुन मिसिंग असलेल्या मुलाचा खांदेश्वर पोलीसांनी अत्यंत कौशल्यपुर्वक तांत्रिक तपास करुन शोध घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आज (बुधवार दि.२२ डिसेंबर) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. १८ वर्षीय कुशल कृष्णा ठाकुर हा मुलगा पनवेल तालुक्यातील ओमकार बिल्डींग, रूम नं. २०२, याठिकाणी परीवारासह राहत होता. दिनांक ०५ डिसेंबर २०१६ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास घरात कोणास काहीएक न सांगता घरातुन निघुन गेल्याबाबत मुलाचे वडील कृष्णा हिराजी ठाकुर यांनी तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून खांदेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या मुलाने घरातुन निघुन जाताना कोणताही पुरावा मागे सोडलेला नव्हता. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधुन काढणे हे पोलीसांसमोर आव्हान होते.


खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुभाष कोकाटे यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी जुन्या अवघड प्रकरणांकडे स्वतः लक्ष घालुन अशी प्रकरणे उघडकीस आणण्याचे दृष्टीने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त, शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, यांच्या सूचनेनुसार खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली सदर मिसिंग प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रविण पांडे हे करीत होते. सदर मिसिंग मुलगा कुशल कृष्णा ठाकुर याच्या पॅनकार्डवरून त्यांच्या बँक अकाउंटची माहिती प्राप्त करण्यात आली. त्यावरून अकाऊंट ओपनिंग फॉर्म प्राप्त करून त्याचा मोबाईल क्रमांक मिळविण्यात आला. सदर मोबाईल कमांकावरून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला असता सदर मिसिंग मुलगा हा वारंवार मोबाईल फोन बंद-चालु करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच राहण्याचे ठिकाणही सातत्याने बदलत होता त्यामुळे त्याचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत होते.


अखेर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पांडे व पोलीस हवालदार सुदर्शन सारंग, पोशि प्रविण पाटील व पथकाने अत्यंत कौशल्यपुर्वक तांत्रिक तपास करून सदर मिसिंग मुलगा कुशल कृष्णा ठाकुर (सध्याचे वय २३ वर्ष) याला मुंबईतील खार येथुन ०५ वर्षानंतर ताब्यात घेवून उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. घरातील कौटुंबिक कलहामुळे सदर मुलगा घर सोडुन गेला असल्याचे व मुंबई परीसरात स्विगीमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मुलाला सुखरूपपणे त्याच्या आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले असुन सदर मुलाचा पोलीसांनी शोध घेतल्यामुळे त्याच्या आई वडीलांनी आनंद व्यक्त करून पोलीसांचे आभार मानले आहे.

Exit mobile version