बांधकामासाठी चिरा, सिमेंट ठोकळ्यांना मागणी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
बांधकामासाठी आता चिरांच्या विटा आणि सिमेंट ठोकळ्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे वीटभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे. शंभर टक्के मागणी असलेल्या विटांना आता फक्त वीस टक्के मागणी असल्याने हा व्यवसाय डबघाईला येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी घरबांधणीसह अन्य बांधकामे जोरात सुरू आहेत. जुने घर तोडून नवे घर बांधणे, जागा घेऊन बांधकाम करणे, अशा अनेक प्रकारच्या बांधकामांना वेग वाढू लागला आहे. बांधकामांसाठी चिरांच्या विटांना अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. मातीच्या विटांची जागा चिरांच्या विटांनी घेतल्याने वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक वीट व्यावसायिक आहेत. भातलावणीची कामे संपल्यावर वीट तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. आदिवासी बांधव कामगार म्हणून वीटभट्टीवर मार्चपर्यंत कामे करतात. त्यातून त्यांना रोजगाराचे साधन मिळते. परंतु, बांधकामासाठी चिरांच्या विटांची घरे बांधण्यावर भर दिला जात आहे. बांधकामासाठी एक चिराच्या विटांमागे आठ मातीच्या विटा लागत असल्याने ग्राहकांनी चिरांच्या विटांना पसंती दर्शविली आहे. तसेच, चिरांच्या विटांसाठी सिमेंटचा वापर कमी होत असून, विटा गार असल्याने त्यांना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे मातीच्या विटांची मागणी कमी झाली आहे. ग्राहकांकडून मागणी नसल्याने तयार झालेल्या विटा शेतामध्ये पडून आहेत. पूर्वी मातीच्या विटांना प्रचंड मागणी होती. गेल्या दोन वर्षांपासून चिरांच्या विटांना 40 टक्के व मोठ मोठ्या इमारतीच्या बांधकामांसाठी विकासकांकडून सिमेंट ठोकळ्यांना 40 टक्के आणि मातीच्या विटांना फक्त 20 टक्के मागणी असल्याचे वीटभट्टी व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
आदिवासींचा रोजगार संकटात
भातकापणीची कामे पूर्ण झाल्यावर रायगड जिल्ह्यातील अनेक भागात वीटभट्टी व्यवसाय सुरु होतो. अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव आदी तालुक्यांमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आदिवासी वाड्यांमधील महिला व पुरुष कामगारांना मार्च महिन्यापर्यंत वीटभट्ट्यांवर रोजगार मिळतो. मात्र, विटांना मागणी कमी झाल्याने हा व्यवसाय आता अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आदिवासी कामगारांचा रोजगार संकटात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसाचा फटका
चिरा व सिमेंटच्या ठोकळ्यांमुळे वीट व्यवसाय अडचणीत सापडत असताना वीट व्यावसायिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शुक्रवारी सायंकाळी अलिबागसह पेण, महाड या भागात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसात तयार केलेल्या कच्च्या विटा पाण्यात भिजल्या. त्यामुळे विटांचे प्रचंड नुकसान झाले. पावसापासून बचाव करण्यासाठी त्या विटांवर प्लास्टिकचे आवरण टाकण्यात आले.
विटा तयार आहेत. मात्र, त्यांना मागणी नाही. फक्त 20 टक्केच मागणी आहे. त्याचा व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची चिंता आहे.
वीटभट्टी व्यावसायिक