पेडली येथील पूल धोकादायक

।सुधागड -पाली । वार्ताहर ।

1989 च्या महापुरानंतर पेडलीपासून आसरे, नवघर, कासारवाडी, धोंडीवली, वान्द्रोशी, कोडंगाव, ठाणाळे व पुरातन विरेश्‍वर मंदिराकडे जाण्याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पेडली येथे पूल बांधण्यात आला होता. या पुलामुळे अनेक गावांशी संपर्क साधता येतो. परंतू 1989 ते 2023 या 34 वर्षाच्या काळात या पूलाची कुठल्याही प्रकारची डागडुजी न केल्याने या पुलाची दुरवस्था झाली असून पूल मोडकळीस आला आहे. तसेच पुलाचे संरक्षक कठडेही तुटले आहेत. पुलावर मोठ मोठे खड्डे पडून पुलाच्या सळ्या बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
आसरे, नवघर, कासारवाडी, धोंडीवली, वान्द्रोशी, कोडंगाव, ठाणाळे या गावातील नागरिकांची प्रमुख बाजार पेठ पेडली आहे.

शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी व पालीला जाणारे मार्ग हे पेडली वरुनच आहे. या गावातील नागरीक गावात राहत असले तरी सर्व व्यवहार हे पेडली मधूनच होतात. जर हा पूल मोडकळीस येऊन पडला तर अनेक गावांचा संपर्क तुटेल व आजू बाजूंच्या गावांच्या रहदारीची दुरवस्था होणार आहे. कारण या पूला व्यतिरिक्त या गावांकडे जाण्याकरिता कुठलाही पर्याय नाही. या बाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली असता ग्रामस्थांनी नाराजीचे सूर काढत एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्‍न येथिल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version