लाखो रुपये खर्च करून बांधलेला पूल बेवारस; अजूनही रामराज येथील जुन्याच पुलाचा वापर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भिलजी-रामराज येथील जून्या पूलाच्या जागी नवीन पूल बांधून दहाहून अधिक वर्षे उलटून गेली. परंतु अद्यापर्यंत त्या पुलाचा वापर करण्यात आला नाही. या पुलासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. अजूनही जून्या पुलाचा वापर केला जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.
अलिबाग तालुक्यातील रामराज ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखळी जाते. दर शनिवारी आठवड्याचा बाजार भरला जातो. कुदे, सुडकोली, नांगरवाडी, उमटे, बोरघर, भिलजी, बापळे, फणसापूर, चिंचोटी, दिवीपारंगी, महाजने, बेलोशी, वावे, मल्याण या गावांसह महाजने दिवीवाडी, सत्यवाडी, होन्डावाडी, धनगरवाडी, आदी वाड्यांमधील नागरिकांची या बाजारात खरेदीसाठी अलोट गर्दी होते. अलिबाग रोहाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रामराज हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. रामराजकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ कायमच असते. भिलजी बोरघर आणि रामराज येथील जून्या पुलाचे कठडे तुटल्याने त्या जागी नवीन पूल करण्याची मागणी त्यावेळी झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत 2015 पूर्वी नवीन पुल बांधण्यात आला. जून्या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात आला. पावसाळ्यात नदीला पुर येत असल्याने पुलावरून पाणी जाते. त्यामुळे पुलाची उंचीदेखील वाढण्यात आली होती. नवीन पूल बांधल्याने या मार्गावरील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यांच्या आनंदाला विरजन पडले. बांधलेल्या पुलाचा अद्यापपर्यंत वापर करण्यात आला नाही. जून्या पुलावरून वाहनांची वर्दळ होत आहे. त्यावेळी बांधण्यात आलेल्या पुलाचे योग्य नियोजन नसल्याने तो पुल वाहतूकीस मोकळा करण्यात आला नाही. आता नवीन पुलाला झुडपांनी विळखा घातला आहे. ठिकठिकाणी गवत वाढले आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल बेवारसस्थितीत आहे. त्याचा वापर होत नसल्याने केलेला खर्च पाण्यात जात आहे. तपासणी करून या पुलाचा वापर वाहतूकीस खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
रामराज-भिलजी येथील बांधलेल्या नवीन पुलाची पाहणी करून तो पूल वाहतूकीस कसा सुरु करता येईल याची लवकरच कार्यवाही केली जाईल.
– राहूल शेळके, उपअभियंता, अलिबाग






