कळमजे नदीवरील पूल धोकादायक

नवीन पुलासाठी मुख्यमंत्र्यांचे वेधणार लक्ष
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणार्‍या वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीत हा पूल कमकुवत होत असल्याने व या पुलाची उंची पुरेशी नसल्याने या नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी नदीला टेकते. त्यामुळे पावसाळ्यात शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. पर्यायाने ही वाहतूक रत्नागिरी, महाड, माणगाव बाजूकडून मुंबईकडे जाणार्‍या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून निजामपूरमार्गे वाहतूक सुरु ठेवली जाते. हा पूल कमकुवत असल्याने या पुलाचे बांधकाम तत्काळ नव्याने सुरु करावे यासाठी काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे लक्ष वेधणार आहेत.

या नदीवर शासनाने प्रवासी, वाहनचालकांना सावधगिरीचा उपाययोजना म्हणून दोन्ही बाजूंनी स्ट्रीट लाईट बसवणे तसेच सूचना फलक लावणे गरजेचे आहे. गोद नदीवरील कळमजे येथील नवीन पूल बांधून त्याची उंची वाढवावी. जेणे करून भविष्यात या महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल यासाठी पूल उभारावा, अशी मागणी श्री. तांबे करणार आहेत.

Exit mobile version