माथेरानचा ब्रिटिशकालीन शारलोट गाळात

। माथेरान । वार्ताहर ।

शहरातील नागरिकांची तहान भागवणार्‍या ब्रिटिशकालीन शारलोट तलावाची पातळी खालावली आहे. तलाव गाळाने भरल्याने साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता असल्याने किमान यंदा तरी पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

माथेरानमध्ये दरवर्षी अतिवृष्टी होते, मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तलावात पाणी कमी आणि गाळ जास्त अशी स्थिती आहे. सध्या शहरात नेरळ-कुंभे येथून पाणीपुरवठा होत आहे. शारलोट तलावाची देखभाल-दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येत असून शुद्धीकरण करून पाणी शहरात वितरित केले जाते. शहरात येणार्‍या पर्यटकांसह स्थानिकही हेच पाणी वापरतात. मात्र नऊ वर्षांपासून तलावाची साफसफाई करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात तीन दिशांचे पाणी तलावात वाहत येत असून जमिनीची धूप होत असल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. 2015 मध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने श्रीसदस्यांमार्फत तलावाची साफसफाई करून गाळ काढण्यात आला होता. त्यानंतर नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे शारलोट तलावाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

तलावाची खोली 60 फूट असून लांबी 500 मीटर व रुंदी 80 मीटर आहे. शारलोट तलाव ऑक्टोबरपर्यंत तुडुंब भरलेला असतो. शहरात येणार्‍या पर्यटकांची संख्या पाहता, तलावातील पाणी फक्त चार महिने पुरते. यासाठी एमजेपी अधिकारी तलावातील पाणी उपसा कमी करीत आहे. सध्या तलावात साठवण क्षमता 40 फुटापर्यंत असून जवळपास 25 फूट गाळ साचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शारलोट तलावाचा इतिहास
माथेरान शारलोट तलावाची निर्मिती ब्रिटिशकाळात झाली. 1856 मध्ये फुलर नावाच्या अधिकार्‍याने तीन दिशांहून येणारे पाणी एकत्र करत शारलोट तलावाची उभारणीचे नियोजन केले. बांध टाकून एक छोटा तलाव पूर्ण केला आणि तलावाला आपल्या पत्नीचे नाव शारलोट दिले. त्यानंतर काही वर्षांनी तत्कालीन नगराध्यक्ष गोपाळराव शिंदे यांनी या तलावाची पातळी वाढवली, तेव्हापासून तलावाचे पाणी शहरवासीयांना उपलब्ध होत आहे.
निधी मिळत नसल्याने काम रखडले
पूर्वी माथेरानमध्ये एमजेपीच्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार देऊन आठ ते दहा दिवस शारलोट तलावातील गाळ काढला जायचा. त्यामुळे साठवण क्षमता वाढून स्वच्छ पाणी माथेरानकरांना मिळायचे. 10 वर्षांपासून एमजेपीकडून निधी मिळत नाही असे सांगितले जाते. त्यामुळे नगरपालिका आणि एमजेपी यांनी मनुष्यबळ लावून संयुक्तरीत्या काम करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गतवर्षांची पुनरावृत्ती नको
गतवर्षी शारलोट तलाव गाळमुक्त करण्यासाठी नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी एकत्र येत तयारी सुरू केली. पालिकेकडून निधीची तरतूदही करण्यात आली होती, पण तलावातील पाणी सोडण्याबाबत पाणी वाहून जाणार्‍या मार्गातील गावातील लोकांना माहिती न दिल्याने काम थांबले. याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, यासाठी कामाचे नियोजन एप्रिलपासूनच करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

शारलोट तलाव माथेरानकरांचे तहान भागवतो. पाणी पातळी वाढवण्यासाठी एमजेपीने आतापासूनच नियोजन केले पाहिजे. पाणी साठा वाढल्यास टंचाईची समस्या काही अंशी दूर होईल. या वर्षी जानेवारीपासून काही विभागात मंगळवार तर काही विभागांत बुधवारी पाणी कपात करण्यात येत आहे. गतवर्षी शारलोट तलाव गाळमुक्त झाला असता तर, पाणीकपातीची वेळ आली नसती.

नितीन विश्‍वनाथ सावंत, स्थानिक नागरिक

तलावाच्या देखभालीकडे एमजेपीचे दुर्लक्ष होत असल्यास मध्यंतरी नगरपालिकेच्या माध्यमातून श्रमदान करून साफसफाई करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये तलाव सफाईसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सहा लाख 66 हजारांच्या खर्चाला तांत्रिक मान्यताही मिळाली होती, मात्र अर्ध्यापेक्षा जास्त पाऊस उलटून गेल्यानंतर तलावाच्या साफफाईला एमजेपीकडून मान्यता मिळाल्याने गाळ काढण्याचे काम होऊ शकले नाही. त्यानंतरही अधिकार्‍याचे दुर्लक्ष झाले आहे.

प्रसाद सावंत, माजी नगरसेवक
Exit mobile version