| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
लोकसंस्कृतीचे निखळत चाललेले घटक आजही गावोगाव भटकंती करताना दिसत आहेत. भटके फिरस्ते दरवर्षी सुगीच्या हंगामात गल्लोगल्ली फिरस्ती करतात. अशा भटक्या जमातीतील लोकांचे ‘गुबूगुबू’ या लोकगीताचे बोल वाजवित हे गावोगाव हजेरी लावताना दिसत आहेत.
सुगीच्या हंगामापासून माघ महिन्यापर्यंत हे फिरस्ते गावोगाव फिरतात. नंदीबैल समाजातील महिला सुया, पिना, दाभण, दातवण, कुंकू, काळं मणी, कंकवा, फणी विक्री करतात. मात्र, बदलत्या काळानुरुप त्यांचा हा फिरता विक्री व्यवसाय आज संकटात सापडला आहे. आता केवळ नंदीबैल सोबत घेऊन हे फिरस्ते आपला उदरनिर्वाह करतात.पूर्वीच्या काळात करमणूक साधने खूप कमी होती. त्यावेळी लोकांचे मनोरंजन करणारे हे फिरस्ते हवे हवेशे वाटत. काळ बदलला, बदलत्या काळाबरोबर करमणुकीची साधने बदलली. रेडिओ, टीव्ही आली, टेपरेकॉर्डर वाजू लागले, पडद्यावर चित्रपट आले आणि मोबाईल आला. त्यामुळे लोकसंस्कृतीचा हा मुख्य घटक हद्दपार होण्याची स्थिती आहे. बैल म्हणजे महादेवाचे वाहन आणि शेतकऱ्यांचा सोबती. मात्र, औद्योगिकीकरणाने या बैलांची संख्या कमी होत चालली आहे. आणखी काही वर्षांनी हा नंदी ‘पूर्वी औत ओढायचा’ हे पुढल्या पिढीला सांगावे लागणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बालगीताची आठवण करुन देणारा हा नंदीबैल सध्या मुरुड तालुक्यातील गावोगाव दिसू लागला आहे. नंदी बैलाला कोणाताही प्रश्न विचारला तरी तो मान डोलवून होय किंवा नाही अशी साचेबद्ध उत्तरे देतो. त्यामुळे काळ कितीही बदलला तरी लहान मुलांना आजही नंदीचे आकर्षण आहे.






