महापालिकेची दंगलग्रस्त भागातील कारवाई स्थगित
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सुप्रीम कोर्टाने जहांगीरपुरीमध्ये एमसीडीकडून सुरु असलेली कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं जहांगीरपुरीमधील उत्तर दिल्ली महानगरपालिकेकडून सुरु करण्यात आलेली अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने जहांगीरपुरीतील स्थिती जैसेथे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी गुरुवारी सुनावणी करण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टात बुलडोजर कारवाई प्रकरणी दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली याचिका उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि इतर भागातील बुलडोजर कारवाई विरोधातील आहे. दुसरी याचिका जहांगीरपुरीतील एमसीडीच्या कारवाई विरोधात करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बुलडोजर कारवाईला स्थगिती दिल्यानंतर एमसीडी अतिक्रमणाविरोधात कारवाई करु शकणार नाही. कोर्टाने जहांगीरपुरीमध्ये जैसेथे स्थिती ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशात गुरुवारी यासंदर्भात काय निर्णय होतो त्यावर पुढील कारवाईचा निर्णय होऊ शकतो.
नवी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली होती. यामिरवणुकीदरम्यान जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार झाला होता. जहांगीरपुरीतील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु करुन आरोपींना अटक केली आहे. उत्तर दिल्ली महानगरपालिकेकडून जहांगीरपुरीतील हिंसाचारानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. बुलडोजर, डंपर घेऊन कारवाई सुरु करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने एमसीडीची जहांगीरपुरीमधील कारवाई थांबवण्यात आली आहे. जहांगीरपुरीतील हिंसाचारानंतर अतिक्रमण विरोधी कारवाई 20 आणि 21 एप्रिल रोजी सुरु राहणार होती. सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं कारवाई थांबणार का हे पाहावं लागेल. मध्य प्रदेशमध्ये देखील बुलडोजरद्वारे हिंसाचाराच्या घटनेतील आरोपींची घरं जमीनदोस्त करण्यात आली होती.
भाजपच्यावतीने जहांगीरपुरीमधील आरोपींच्या अतिक्रमणावर बुलडोजर चालवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. उत्तर दिल्ली महापालिकेने आरोपींच्या अतिक्रमणातील घरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. या कारवाईला असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध दर्शवला होता. अशा प्रकारची कारवाई उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये करण्यात आली होती.
जहांगीरपुरीत बुल्डोजर थांबला
