जहाजांना मार्ग दाखवणारा बोया मुरुडच्या किनारी वाहून आला

। मुरूड । वार्ताहर ।
मुरुड समुद्रकिनारी जहाजांना मार्ग दाखवणारा हिरव्या रंगाचा बोया वाहून आला असल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. आगरदांडा-दिघी पोर्ट बंदरामध्ये येणार्‍या जहाजांना मार्ग दाखविण्यासाठी दिघी-राजपुरी खाडीमध्ये समुद्राच्या पाण्यात दोर बांधून हे बोये टाकण्यात आले आहेत. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या वादळामुळे व समुद्राच्या उधाणामुळे मार्ग दाखवणार्‍या बोयांचे दोर तुटल्याने हे वाहत मुरुडच्या समुद्रकिनारी आले आहेत. एखाद्या पाण्याच्या टाकीप्रमाणे असणारे हे बोये पाहून स्थानिकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते.

पाण्याची टाकी वाहून आली की काय?अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली. दिघी पोर्टमध्ये जहाजांची ये-जा सुरू असते. हे जहाज सुरक्षित मार्गाने दिघी बंदरात येण्यासाठी समुद्रामध्ये मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर दोन्ही बाजूला लाल व हिरवे असे दोन रंगाचे बोये पाण्यामध्ये दोर टाकून उभारण्यात आले आहेत. बोयांच्या आधारे येणारे जहाज सुरक्षितपणे दिघी बंदरात दाखल होत असतात. मात्र सद्यस्थितीत बोया तुटल्याने येणार्‍या जहाजांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी दिघी पोर्ट प्रशासनाला माहिती दिली आहे.

Exit mobile version