| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसीतील पडवी या गावांमध्ये घरफोडी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घरफोडीबाबत चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाड एमआयडीसी पोलिसांनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या 24 तासांमध्ये या चोरट्याच्या मुस्क्या आवळल्या. प्रणित साळुंखे असे चोरट्याचे नाव असून, तो गावातलाच निघाल्यामुळे गावामध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणित साळुंखे याने आपल्याच गावातील बंद घराचा फायदा घेऊन तब्बल साडेचार लाख रुपये दागिने चोरले होते. संबंधित गुन्हा दाखल होताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या संयुक्त टीमने तपास केला असता आरोपी अवघ्या 24 तासांमध्ये जेरबंद झाला. सुरुवातीला तपासाची सूत्रे पोलीस हवालदार आशिष नटे यांच्याकडे दिली असता पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे व त्यांची टीम चोराचा शोध घेत होते. तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त तपासामुळे घरफोडी करणारा चोरटा सापडला.






