| अमरावती | वृत्तसंस्था |
अमरावती शहरातून एका सिटी बसचा भीषण अपघात झाला असून यात भरधाव सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका 9 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश असून त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली आहे.
या भीषण अपघाताच्या घटनेनंतर जमावाकडून बसची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तर प्रीतम गोविंद निर्मळे या 9 वर्षाच्या चिमुकल्याचा बसच्या चाकाखाली येऊन घटनास्थळावरच मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. तर नर्मदा निर्मळे (६) आणि वैष्णवी संजय निर्मळे(१४), नेहा संतोष निर्मळे या तिघांचीही प्रकृती आत्यावस्थ असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर नागरिकांचा रोष लक्षात घेता सध्या सायन्सकोर मैदानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.