। मुरूड । प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ अभियानांतर्गत मुरुड नगरपरिषदेतर्फे समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 17 डिसेंबर 2022 या आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिवसापर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मानव जातीला समुद्र आणि महासागर प्रादेशिक संपत्ती नेहमी लाभदायक ठरली आहे. अर्थात, संकटाच्या काळात वापरलेल्या प्लॅस्टिकजन्य वस्तू जलमार्गाच्या माध्यमातून किनारा व समुद्रापर्यंत पोहोचत आहेत. ही फार मोठी गंभीर समस्या असून, याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
यावर्षी देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने देशातील 75 समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम 75 दिवस राबविण्याचे शासनाने योजले आहे. ही मोहीम ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’च्या बाबतीत जागरूकता वाढवण्यासाठी 3 जुलैपासून 17 डिसेंबर 2022 या आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिवसापर्यंत राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, या मोहिमेत उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार रवींद्र सानप, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, माजी नगरसेवक प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, अविनाश दांडेकर, युगा ठाकूर, अनुजा दांडेकर, तहसील व नगरपरिषद कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.