कालव्याचे पाणी पुन्हा पेटणार

पाण्यासाठी बळिराजाचा पुन्हा ‌‘एल्गार’; सोमवारी पाणी जागर अभियान, बाईक, बैलगाडी रॅली, गाण्यातून प्रबोधन

| धाटाव | वार्ताहर |

संबंध रायगड जिल्ह्यासह राज्यात चर्चेत आलेल्या कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच मिळत आहे. कालव्याच्या पाण्यासाठी सोमवारी जागतिक अन्नदिनी बळिराजा पाणी जागर अभियान आंदोलन करणार आहे. पाटबंधारेच्या कार्यालयासमोरील मुंबई-गोवा महामार्ग रस्तालगत पाण्यासाठी आंदोलन होणार असल्याने सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पाणी जागर आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली. यावर्षी कालव्याला पाणी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. कालव्याच्या पाण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करू, असा गर्भित इशारा बळिराजा फाऊंडेशनने पुन्हा एकदा दिला. त्यामुळे सोमवारच्या पाणी जागर आंदोलनातील सहभागी शेतकरी, बळिराजा नेमकी काय भूमिका घेतो, पाटबंधारेचे अधिकारी आंदोलनकर्त्यांना नेमके काय आश्वासीत करतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, कालव्याच्या पाण्यासाठी 2017पासून चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रारंभी जागर अभियान आहे. कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी, सिंचन हंगामात कालव्याला पाणी सोडण्यात यावे अन्यथा काय परिणाम होतील? याची प्रशासन, शासनाला कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनाच्या पूर्वसंस्थेला बळिराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली, तर कालव्याच्या पाण्यासाठी बळिराजाने पुन्हा एल्गार केल्याने संबंधित सर्वच प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी सकाळी बळिराजा फाऊंडेशनच्या मध्यवर्ती कार्यालय तळाघर येथून बाईक रॅलीद्वारे आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. रॅली बोरघर, तळाघर, धाटाव, बारसोली, किल्ला, संभेमार्गे आंदोलन ठिकाणी जाणार आहे. समाज प्रबोधन गाण्यांतून पाण्याचा जागर होईल, यावेळी कोलाड नाका ते आंदोलन जागेपर्यंत बळिराजा फाऊंडेशनचे नेतृत्व बैलगाडीतून शासनाचे लक्ष वेधतील, शासनाला पाण्यासाठीची जाणीव देतील अशी अधिक रूपरेषा सचिव ॲड. दीपक भगत यांनी दिली आहे.

आंदोलनात बळिराजा फाऊंडेशनचे पदाधिकारी काय बोलतात, नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांना सामोरे जात पाटबंधारेचे मुख्य कार्य. अभियंता मिलिंद पवार काय आश्वासीत करतात, कालव्याची दुरुस्ती, पाण्याबाबत काय माहिती देतात? त्यावर बळीराजा फाउंडेशनचे नेते पुढे काय रणनीती ठरवितात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, पाणी जागर आंदोलन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत. यातून आता कालव्याचे पाणी पुन्हा पेटणार हे अधोरेखित झाले आहे.

पाण्यासाठी अनेक आंदोलने
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी कालवा समन्वय समिती, नंतरच्या बळीराजा फांऊडेशनने आतापर्यंत अनेक आंदोलने केली. 1 मे महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. त्याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले. कालव्याची दुरुस्ती कामे तातडीने करून पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने देताच आमरण उपोषण तूर्तास मागे घेतले होते. त्यानंतर कालव्याची दुरुस्ती करून पाणी काही अंतरावर आणण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, पुढील दुष्काळग्रस्त गावांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे आता पाऊस संपताच बळिराजा आक्रमक झाला. सिंचन हंगामात पाणी सोडण्यात यावे, असा इशारा बळिराजा फाऊंडेशनने निवेदनातून तहसील, पाटबंधारे प्रशासनाला दिला. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी जागतिक अन्न दिनी कोलाड येथे पाणी जागर अभियान होत आहे.

पाण्याअभावी भीषण टंचाई
कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. कालव्याला आठ-दहा वर्षे पाणी नसल्याने परिसरात ऐन उन्हाळ्यात भयानक दृश्य पाहायला मिळते. पाण्याचा स्रोत संपुष्टात येत असल्याने विहिरी, बोअरवेल आटतात. त्यातच ग्रामपंचायतीच्या अनेक पाणी योजना निकामी ठरत असल्याने मुख्यत: लांढर, बोरघर, तळाघर गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कालव्याचा पाणीप्रश्न अखेर ग्रामस्थांनी हातात घेत पाण्यासाठी लढा सुरू केला. कालव्याची तातडीने दुरुस्ती करून कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक अन्नदिनी कोलाड येथे पाणी जागर अभियान करण्यात येणार आहे.

Exit mobile version