कोळी समाजाचा उमेदवार ठरला

श्रीवर्धनचे पांडुरंग चेवले यांचे नाव निश्‍चित

| रायगड | खास प्रतिनिधी |

संसदेमध्ये कोळी समाजाचा आवाज उठवणारा खासदार पाठवण्याची तयारी कोळी समाजाने पूर्ण केली आहे. श्रीवर्धनचे माजी नगरसेवक पांडुरंग दामोदर चेवले यांचे नाव निश्‍चित करण्यात आल्याची माहिती रायगड कोळी संघाचे अध्यक्ष धर्मा घारबट यांनी दिली.

चेवले यांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी रायगड आणि रत्नागिरी मतदारसंघातील कोळी समाजातील पदाधिकार्‍यांची, कोळी समाजाची सभा घेऊन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. याबाबतची बैठक वरसोली येथील खंडोबा मंदिरात 10 मार्च रोजी झाली होती. या बैठकीला विविध तालुक्यांतील कोळी समाजे प्रत्येकी पाच प्रतिनिधी आणि काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यानुसार शुक्रवारी 15 मार्च रोजी घारबट यांच्या निवासस्थानी निवडक पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली होती.

गेल्या काही वर्षांपासून मासळीचा दुष्काळ सुरु असल्याने मच्छिमारी करणार्‍यांवर उपासमारीचे संकट आले आहे. डिझेल परतावा, मासेमारीचा कृषी क्षेत्रात समावेश करणे, रासायनिक प्रदूषण, किनार्‍यावरील जमिनी नावावर करणे, तसेच कोळी समाजाला मिळणारे जातीचे दाखलेदेखील देणे बंद केल्याने समाजाला फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासह अन्य प्रश्‍न सातत्याने समाजाला सतावत असतात. या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याच समाजातील कोणी तरी पुढे आले पाहिजे आणि दिल्लीत संसदेमध्ये आवाज उठवून ते प्रश्‍न तडीस नेले पाहिजेत, अशी समाजाची इच्छा आहे. यासाठी पांडुरंग चेवले यांची निवड करण्यात आली.

चेवले हे श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये दोन वेळा नगरसवेक होते. त्यांनी सभापतीपदही सांभाळले आहे. तसेच, ते विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक आणि राजकीय अभ्यास असल्यानेच त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. अंतिम निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version