शिंदे गटाचा उमेदवार तोंडावर पडणार

वरुण सरदेसाईंनी महायुतीसह भुजबळांना डिवचलं

| नाशिक | प्रतिनिधी |

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत अद्यापही कायमच असल्याचे चित्र आहे. नाशिकची परिस्थिती अशी की, उमेदवार ठरत नाही याचे कारण नक्की हरणार कोण? किती मतांनी हरायचे, हे तीन पक्षात ठरत नाहीये. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट नको म्हणतंय, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तोंडावर पडणार आहेत. मात्र, कोण हे अजून ठरायचे बाकी आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेनाच जिंकणार असा सर्व्हे आला. म्हणूनच भुजबळांनी माघार घेतली, असे म्हणत ठाकरे गटात नेते वरुण सरदेसाई यांनी मंत्री भुजबळांसह महायुतीवर निशाणा साधला.

एकीकडे नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा तिढा कायम असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. शनिवारी सायंकाळी वाजेंच्या प्रचारार्थ पक्षाचे सचिव वरूण सरदेसाई नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत पाथर्डी फाटा परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.’

म्हणूनच भुजबळांनी माघार
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाही याचे कारण नक्की कोणी हरायचे? किती मतांनी हरायचे? हे तीन पक्षात ठरत नसून सर्व्हेमध्ये नाशिकला शिवसेना (ठाकरे गट) जिंकणार असल्याचं समोर आल्याने छगन भुजबळांनी माघार घेतल्याचे वक्तव्य वरूण सरदेसाई यांनी केले आहे.
Exit mobile version