| माणगाव | प्रतिनिधी |
ताम्हिणी घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नोव्हेंबर महिन्यात याच दरीत सहा पर्यटकांचा बळी घेणाऱ्या कोंडेथर गावच्या हद्दीतील त्या अवघड उतार वळणावर आज पुन्हा भीषण अपघात झाला. शुक्रवारी (दि.2) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास हुंदाई मारुती कार क्रमांक एमएच 12 वायक्यू 2234 ही 500 फूट खोल दरीत कोसळून शुभम आजबे, (28) रा. सोलापूर ब्रह्मपुरी तांबडी या चालकाचा जागीच मृत्यू झाला. 500 फूट दरीत मारुती कार कोसळल्याने गाडीचा चेदामेंदा झाला होता. तसेच चालक गाडीतच मृत अवस्थेत अडकून पडला होता.
या अपघातानंतर वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. दरीतील अतिशय खडतर भूभागामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, आजच्याच दिवशी याच कोंडेथर गावच्या हद्दीत सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या खासगी ट्रॅव्हल्स बस वाहनाचा अपघात झाला होता. ती गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या डोंगराच्या कठड्याला जोरात धडकल्याने 20 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या घटनेची धास्ती नागरिक पचवतात न पचवतात तोच, अवघ्या तीन तासांच्या फरकाने दुसरा प्राणघातक अपघात घडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. तीस दिवसांपूर्वी याच ठिकाणी पर्यटकांची थार गाडी दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना न झाल्याने आज पुन्हा एक जीव गमवावा लागल्याचा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या ठिकाणी तातडीने मजबूत संरक्षक कठडे, धोक्याची स्पष्ट सूचना देणारे फलक, वेगमर्यादा नियंत्रण, नियमित पोलीस गस्त यांची त्वरित अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी होत आहे. ताम्हिणी घाट निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जात असला, तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे आजच्या घटनांनी पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.







