महिला मारहाण प्रकरण चिघळले

ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल
मविआ नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

| ठाणे | प्रतिनिधी |
ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे,जितेंद्र आव्हाडांसह उपस्थित मविआ नेत्यांनी शिंदेशाहीवर एकच हल्लाबोल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट आव्हान दिले.आगामी निवडणूक ठाण्यात शिंदे यांच्याविरोधत लढविण्याचा निर्धारही ठाकरे यांनी केला.

या वेळी आ.आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार करीत असताना त्यांची मिमिक्रीदेखील केली. या मिमिक्रीमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हंशा पिकला. या वेळी उपस्थितांनी वन्स मोअरचे नारे देत, पुन्हा एकदा मिमिक्री करण्याची विनंती केली.आमच्या मोर्चाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 17 अटी घालण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही, भाषण करायचे नाही? का गद्दार लोकांच्या टोळीने रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आमचे नेते पोलीस आयुक्तांकडे गेले असता पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले. अशी टीकाही त्यांनी केली.

आ.जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले.त्यानंतर सर्व नेतेमंंडळी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यासाठी गेले होते.तेथेही पोलीस आयुक्तांसमवेत जोरदार खडाजंगी झाली.मात्र अद्यापही त्या मारेकर्‍यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही.

फेसबुकवर फक्त एक पोस्ट टाकली म्हणून तुम्ही महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करता. पोलीस मारहाण करणार्‍यांवर कारवाई करीत नाहीत, आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत, कारण ते वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आदेश घेत आहेत. आज अधिकारी जागेवर नाहीत, महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाहीत तर गुजरात, गुवाहाटीचे मुख्यमंत्री बसले आहेत. – आदित्य ठाकरे,आमदार

Exit mobile version