खानपान व्यवस्था कोलमडली; प्रवाशांची मोठी गैरसोय

| कर्जत | प्रतिनिधी |

जागतिक पर्यटन स्थळ, थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या माथेरान रेल्वे स्थानकातील खानपान व्यवस्था 2004 पासून बंद आहे. या घटनेला 19 वर्षांचा कालावधी लोटला आहे. रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

माथेरानची मीनी ट्रेन 1907 साली सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या खानपानाची व्यवस्था व्हावी याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने सन 1950 च्या दशकात अल्प दरात माथेरान रेल्वे स्थानकात खानपान व्यवस्था सुरू केली. त्यावेळी खानपान व्यवस्थेचे वाय.एस. दिवाडकर हे ठेकेदार होते. खानपान व्यवस्थेच्या दोन मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर जेवण, चहा, नाश्ता अगदी स्वस्त दरात मिळत तर पहिल्या मजल्यावर रेल्वेचे हॉलीडे होम होते. हे देखील स्वस्त दरात मिळत असल्याने अनेक रेल्वे कर्मचारी येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येत असत. पण रेल्वे प्रशासनाकडून सन 2004 नंतर बंद करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाचे नवनवीन प्रयोग करून रेल्वे प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देणार्‍या रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे माथेरान रेल्वे खानपान व्यवस्था पुरविणारी सदर इमारत मात्र अखेरची घटका मोजत आहे. पूर्वी माथेरानच्या मिनीट्रेनने प्रवास करणार्‍या प्रवाशांना तसेच पर्यटकांना ही खानपान व्यवस्था वरदान ठरत असे. गाडी येण्यास व गाडी माथेरान स्थानकातून सुटण्यास वेळ असल्यास पर्यटक या ठिकाणी बसत असत. येथे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे व स्वस्त दरात असल्याने याचा लाभ घेत असत. परंतु, रेल्वे प्रशासनाने अधिक जास्त दराच्या निविदा काढल्याने ह्या निविदा भरण्यास कुणीही ठेकेदार पुढे येत नाही. 1985 च्या दशकात येथे शाकाहारी जेवणाची थाळी पावणे चार रुपये, तर मांसाहारी थाळी पावणे पाच रुपयात, डबल आम्लेट प्लेट दोन रुपयाला, तर चपाती पंधरा पैसे दराला मिळत होती. अन्य खाद्यपदार्थ एमआरपीप्रमाणे मिळत असत. 2004 साली ही खानपान व्यवस्था बंद झाली, त्यावेळेस शाकाहारी भोजन बावीस रुपये तर मांसाहारी भोजन सत्तावीस रूपयांत मिळत असे. परंतु, जादा भाडे मिळावे ह्या लालसेपोटी व येथील प्रवाशांच्या व पर्यटकांच्या सोयी, सुविधेचा कणभरदेखील विचार न करता मध्य रेल्वे प्रशासनाकडून बंदच करण्यात आली. यामुळे रेल्वेचे तर नुकसान होतच आहे. पण, प्रवाशांचीसुद्धा मोठी गैरसोय होत आहे.

रेल्वेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या चुकीच्या व जाचक अटी-शर्तींमुळे रेल्वे विभागाच्या आर्थिक नुकसानीसह पर्यटक व नागरिकांचीदेखील गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन माथेरान येथील रेल्वेची खानपान व्यवस्था पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आहे.


माथेरान रेल्वे स्थानकावरील खानपान व्यवस्था सुरू करावी, त्यामुळे पर्यटक, प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होईल.

दिंगबर चंदने
सामाजिक कार्यकर्ते

इमारत मोडकळीस
मिळालेल्या माहितीनुसार, एकदा रेल्वेचे काही तपासणी अधिकारी रविवारच्या दिवशी माथेरानला रेल्वे खानपानचा व्यवसाय तपासणी करण्यासाठी आले आणि त्यांनी त्या अनुषंगाने जास्त भाडे आकारण्याचा निर्णय घेतला. अडीच हजार रुपयांवरून थेट पंचवीस हजार रुपये भाडे केले, त्यातही अगोदरच्या आठ वर्षांचा डिफरन्स भरायला सांगितला. तसेच इमारतीच्या डागडुजीसाठी येणारा सर्व खर्चदेखील ठेकेदारांनी करायचा आणि प्रत्येक वस्तू ही कर्जत नेरळ किंवा अन्य रेल्वे स्थानकात ज्या विक्री दराने करतात त्याच दराने विक्री करणे, या सर्व किचकट अटींमुळे कुणीही ठेकेदार निविदा पुढे येत नसल्याने खानपान व्यवस्था कायमची बंद पडली असून, आता ही पुरातन इमारतदेखील मोडकळीस आली असून शेवटची घटका मोजत आहे.

Exit mobile version