धक्कादायक! माथेरानमधील झाडे मरण्याचे कारण आले समोर

वाळवीमुळे असंख्य झाडे मरणावस्थेत; वन विभागाचे दुर्लक्ष
। माथेरान । मुकुंद रांजाणे ।
वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही संतांची काव्यरचना खर्‍या अर्थाने पिढ्यानपिढ्या वास्तव्यातील परिस्थितीवर भाष्य निर्माण करणारी आहे. परंतु आजकाल सर्वत्रच वृक्षारोपण म्हणजे एकप्रकारचा दिखावा, पोकळ प्रसिद्धी दाखवण्याचे अन वनराई बद्दल किती आस्था, आपुलकी, प्रेम असल्याचा भास अभिप्रेत करण्यासाठी केलेली एक केविलवाणी धडपड प्रत्यक्षात दिसून येत आहे.

समुद्रसपाटीपासून जवळपास 927 मीटर उंचीवर विराजमान झालेले सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक टुमदार आणि थंड हवेचे प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ म्हणून माथेरानचे नाव जगप्रसिद्ध आहे. विविध प्रकारची लाखो झाडे अनेक वर्षांपासून मोठ्या दिमाखात उभी आहेत. यातील अनेक झाडे ही जुनी झाली असून बहुतांश ठिकाणी या झाडांना वाळवी लागल्याने ती मरणावस्थेत दिसत आहेत. त्यामुळेच एखाद्या अतिवृष्टीमुळे या झाडांची आपसूकच पडझड झाल्याचे दरवर्षी पहावयास मिळते.

वनखात्याच्या अधिकारी वर्गाला या सर्व बाबींचे निराकरण करणे शक्य नसल्याने यासाठी वनसंरक्षक समितीची स्थापना याठिकाणी करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य कार्य हे केवळ वनांचे संरक्षण करणे हेच आहे. परंतु याकडे आजवर स्थापित केलेल्या कुठल्याही वनसंरक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनी ही बाब गांभीर्याने विचारात घेतलेली दिसून येत नाही. यातील कुणीही सदस्यांच्या गटाने एखाद्या जंगल भागाला आवर्जून भेट दिल्याचे ऐकिवात सुध्दा नाही.

जवळपास वीस सदस्यांची ही समिती कार्यरत असून महिला सदस्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. यातील क्वचितच कुणी एखाद्या मिटींगला उपस्थिती दर्शवित असेल. मीटिंग झालेली देखील बहुतेक सदस्यांना ठाऊक नसते. या समितीने काय महत्वपूर्ण निर्णय घेतले, वृक्षारोपण करण्यासाठी किती रोपे मागवली, त्यासाठी किती लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, याबाबत अनेकांना कल्पना सुध्दा नसते. विशेष म्हणजे नगरपरिषदेत ज्या पक्षाची सत्ता स्थापन झालेली आहे, त्यातील कार्यकर्त्यांना ह्या समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येते. परंतु सत्ताधारी शिवसेनेने पक्षातील कार्यकर्त्यांना ज्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी मेहनत घेतली होती त्यांनाच वगळून आपापले नातेवाईक आणि अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना यामध्ये सामावून घेतले आहे.

दरवर्षी वृक्षारोपणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा अक्षरशः चुराडा केला जात आहे. वृक्षारोपणाचा दिखावा न करता ज्या ठिकाणी ही रोपे लावण्यात आली आहेत, त्याठिकाणी हरित लतावेलींचा देखावा पर्यटकांच्या नजरेत कशाप्रकारे साठेल अन् पर्यटकांची संख्या वाढून सर्वानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे

वनसंरक्षक समितीचे मुख्य काम हे वनराईचे सुयोग्य प्रकारे संगोपन करणे. त्यांची देखभाल, त्या झाडांवर औषधाची फवारणी करून त्यांचे आयुष्य कसे वाढेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हाच एकमेव उद्देश आहे. गर्द वनराईमुळेच येथे पर्यटकांची रेलचेल सुरू असते. पॉईंट भागातही आवश्यक ठिकाणी विकासकामे पूर्ण करणे गरजेचे आहे. दरवर्षी शेकडो झाडे वादळी वार्‍याने उन्मळून पडतात.घोड्यांच्या मलमुत्रामुळे सुध्दा बहुतांश झाडी दरवेळी लोप पावत चालली आहे त्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने एकतरी झाड जगविलेच पाहिजे तरच हे माथ्यावरचे रान आपले माथेरान अबाधित राहू शकते. त्यासाठी महत्त्वाची जबाबदारी ही वनसंरक्षक समितीची असून गावाच्या हितावह व्यापक दृष्टिकोन ठेऊन कामे मार्गी लावणे यासाठी सचोटीने प्रयत्न केल्यास निश्‍चितच हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ नावारूपाला येऊ शकते. असे जेष्ठ नागरिकांमधून बोलले जात आहे.

Exit mobile version