कंपनीतील स्फोटाचे कारण गुलदस्त्यात

ब्ल्यू जेट दुर्घटनेप्रकरणी कारवाईस विलंब

| महाड | प्रतिनिधी |

औद्योगिक क्षेत्रातील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत दोन महिन्यापूर्वी झालेल्या दुर्घटनेमध्ये अकरा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता तर पाच कामगार जखमी झाले होते. या गंभीर घटनेची चौकशी करण्याकरता महाडचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली, मात्र अद्याप समितीकडून अहवालच न आल्याने अपघातामध्ये कारण गुलदस्त्यातच आहे. समितीच्या अहवालानंतरच अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याने या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशनामध्येही या मुद्द्यावर चर्चा झाली होती.

महाड औद्योगिक क्षेत्रामधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये तीन नोव्हेंबर 2023 ला सकाळी प्रथम रिऍक्टरचा स्फोट होऊन अचानक आग लागली. स्फोटामुळे कंपनीचे स्ट्रक्चर खाली पडल्याने अनेक कामगार स्ट्रक्चर खाली दबले. हा अपघात इतका भयानक होता की, मदत कार्यासाठी पुण्याहून एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आले होते. अकरा कामगारांचा यात होरपळून मृत्यू झाला होता तर कामगारांची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणी करण्यात आली.

पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर, अपघाताची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली. समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापन जी.एस. हरलया, पनवेल येथील कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ, महाड उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. हजारे, महावितरणचे गोरेगाव येथील कार्यकारी अभियंता आर. जे .पाटील, महाड येथील अग्निशामक दलाचे अधिकारी प्रवीण घोलप व महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांचा समितीमध्ये समावेश आहे.

कामगारांमध्ये संशयाचे वातावरण
ब्ल्यू जेट कंपनीतील अपघाताची कारणमीमांसा जाणून घेण्याकरता नेमलेल्या समितीचा अहवाल दोन महिने पूर्ण झाले तरी अद्याप प्राप्त झालेला नाही. अपघाताला अनेक कांगोरे असल्याने आणि विविध विभागाचा या चौकशीमध्ये समावेश असल्याने अहवाल प्रसिद्ध होण्यास विलंब होत आहे. कंपनीच्या आवारामध्ये जे स्ट्रक्चर खाली कोसळले आहे, तो भाग पूर्णपणे साफ केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामागील कारण स्पष्ट होणार आहे. महावितरणला देखील कोसळलेला भाग पूर्णपणे साफ केल्याशिवाय शॉर्ट सर्किट अथवा अन्य कारणांचा उलगडा होईल. परंतु प्रत्यक्षात अहवाला गती प्राप्त होत नसल्याने कामगार व त्यांच्या नातेवाईकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अहवालावर सर्वकाही अवलंबून असल्याने यात कोणाला पाठीशी घातले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कंपनीमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे काम विविध पातळीवर केले जात आहे. हा अपघात गंभीर असल्याने सखोल चौकशी होत आहे. लवकरच अहवाल सादर केला जाईल.

डॉ. ज्ञानोबा बानापुरे, प्रांताधिकारी, महाड

Exit mobile version