| उरण | वार्ताहर |
उरण सिडकोच्या द्रोणागिरी सीएफएस विभागातील आयओटीएल पेट्रोल पंप ते डीआरटी पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा कंटेनर, ट्रेलर आणि सिमेंटचे ब्राऊजर सारख्या अवजड वाहनांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून येथील कंपन्यांमध्ये पार्किंगची सुविधा नसल्यामुळे ही वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत.
द्रोणागिरी नोडमधील आयओटीएल पेट्रोलपंप ते द्रोणागिरी रस्त्यालगत सिमेंट निर्मितीचे कारखाने आहेत. कित्येक वर्षापासून या कंपनीकडे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे येणारी अवजड वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. या रस्त्यावर शेकडो वाहने दररोज उभी केली जात असल्याने या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होते. महत्त्वाचे म्हणजे, द्रोणागिरी नोड परिसरातील आयओटीएल-नवघर हा रस्ता अपघात प्रवण भाग आहे. या कंपनीच्या ब्राऊजर तसेच ट्रेलरमुळे होणाऱ्या कोंडीतून मार्ग काढताना अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. मात्र, केवळ नफा कमावण्यात व्यस्त असलेल्या या कंपन्यांना होणाऱ्या अपघातांशी काही देणेघेणे नसल्याने दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढच होत आहे. पण असे होत असतानाही वाहतूक पोलिस या वाहनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा पार्किंगचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
शुल्क वसुलीसाठी टोळ्या कार्यरत सिडकोने द्रोणागिरी नोड-1 या विभागात अवजड वाहनांसाठी पे अँड पार्क मध्ये मोजकीच वाहने पार्क केली जातात. रस्त्यावर बेकायदा पार्क केलेल्या पार्किंगचे शुल्क कमी असल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येतात. तर सिडकोच्या या रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांकडून काही स्थानिक पार्किंग शुल्क आकारत आहेत. यासाठी वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे अवजड वाहनांच्या पार्किंगवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
द्रोणागिरी नोड-1 या विभागातील बेकायदा पार्किंगवर नेहमी कारवाई करतो. परंतु, जेएनपीएच्या माध्यमातून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे परिसरातील 250 ते 300 गाड्यांचे वाहनतळ अपुरे पडत आहे.
मधुकर भटे, पोलिस निरीक्षक, उरण वाहतूक शाखा