तिसर्‍या लाटेची शक्यता कमी

आयसीएमआरच्या माजी प्रमुखांचा दावा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाची देशव्यापी तिसरी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. जरी आलीच, तरीही ती दुसर्‍या लाटेच्या तुलनेत खूपच कमी तीव्रतेची असेल, असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता जरी कमी असली, तरी शाळा पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयासाठी कोणतीही घाई करू नये.
नव्या अभ्यासांनुसार लहान मुलांमध्येही कोरोनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम आढळून आल्याचेदेखील यावेळी डॉ. गंगाखेडकर म्हणाले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय सरसकट घेतला जाऊ नये. कोरोना रुग्णांच्या संख्येच्या आधारे ठराविक क्षेत्रातील शाळा उघडण्याचा निर्णय घ्यावा. रमण गंगाखेडकर यांनी यावेळी असा विश्‍वास व्यक्त केला की, कोव्हिड-19 इन्फ्लूएन्झा व्हायरससारखा संपू शकतो. त्याचप्रमाणे, कोरोना प्रतिबंधक लसीमुळे आता कोरोनाबाधित रुग्ण हे लक्षणेहीन असू शकतात किंवा त्यांना अगदी सौम्य लक्षणं जाणवू शकतात. पर्यायाने चाचण्यांची आणि कोरोनाबाधितांची संख्यादेखील कमी होऊ शकते, असेही ते यावेळी म्हणाले.
दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज तयार
चौथ्या सिरो सर्वेनुसार, देशातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. देशात जस जशी लसीकरणाची व्याप्ती वाढेल, तस तसे देशातील हॉस्पिटलायझेशन, गंभीर आजार आणि मृत्यूच्या प्रकरणांची नोंद देखील कमी होईल. मात्र, कोरोना संक्रमणाच्या संख्येत वाढ होत राहील. कारण, लसीकरणामुळे कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळत नाही. या लसींच्या परिणामांमध्ये आजार बदलतात, त्याप्रमाणे बदल होतो, म्हणजेच या डिसीज मॉडीफाईंग लसी आहेत. परंतु, संसर्गापासून पूर्ण संरक्षण करण्याची क्षमता त्यांच्यात नाही.

कोरोना प्रकरणांची संख्या कायम राहू शकते. परंतु, नवीन स्ट्रेन येईपर्यंत आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण नाही.
डॉ. रमण गंगाखेडकर

Exit mobile version